ट्रक रिव्हर्स घेताना पाण्याची पाईपलाईन फुटली
भिवंडी : भिवंडीतील वऱ्हाळ देवी परिसरात रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक मागे घेत असताना ट्रकचे चाक महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन वरुन गेल्याने पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेल्याची घटना घडली. या घटनेनंतर चालक ट्रकसह पळून गेला आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ३ तासांच्या अथक परिश्रमानंतर पाईपलाईन दुरुस्त करुन पाणीपुरवठा पूर्ववत केला.
सदर घटनेबाबत भिवंडी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटनवार यांनी सांगितले की, १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकचा चालक ट्रक मागे घेत होता. त्यावेळी ट्रकचे चाक भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पाईपलाईन वरुन गेल्याने पाईप फुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात होते. याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल होत दुसऱ्या वॉलमधून प्रथम पाणीपुरवठा बंद केला. त्यानंतर संदीप पटनावर यांनी त्यांच्या पथकासह पूर्ण परिश्रमाने पाईपलाईन दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु केले.
अखेरीस सुमारे ३ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पाईपलाईन दुरुस्त करून पुन्हा पाणी पुरवठा सुरळीत केला. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी या जलद कारवाईबद्दल महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. तसेच दोषी ट्रक चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस पावले उचलली गेली पाहिजेत, अशीही नागरिकांनी मागणी केली आहे. .