एपीएमसी फळ बाजारातील ३ लिफ्ट बंद
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजार आवारातील मध्यवर्ती सुविधा इमारतीमध्ये असलेल्या चार लिपट पैकी केवळ एकच लिफ्ट सुरु असून उर्वरित तीन लिपट बंद असल्याने मध्यवर्ती सुविधा इमारत मधील कर्मचारी तसेच नागरिकांची चढ-उतार करताना चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती सुविधा इमारत मधील बंद लिफ्ट लवकरात लवकर दुरुस्त करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांसह नागरिकांकडून होत आहे.
एपीएमसी फळ बाजारातील मध्यवर्ती सुविधा इमारत सात मजली आहे. या इमारतीत साधारणतः ३०० कार्यालय असल्याने या इमारतीत नागरिकांची मोठी वर्दळ असते. मध्यवर्ती सुविधा इमारतीत चार लिपट आहेत. मात्र, या चारही लिस्ट याआधी बंद होत्या. परंतु, काही दिवसांपूर्वी बंद चारपैकी एक लिफ्ट दुरुस्ती करण्यात आली असून, उर्वरित तीन लिफ्ट बंद आहेत. मध्यवर्ती सुविधा इमारत मध्ये मोठ्या प्रमाणावर येत असलेल्या नोकरदार वर्ग आणि नागरिकांना एक लिफ्ट अपुरी पडत आहे. त्यामुळे या इमारतीमध्ये ये-जा करणारे कर्मचारी तसेच नागरिक यांना जिन्यावरुन चढ-उतार करावी लागत आहे.