मराडे पाडा शक्तिपीठ येथे कलावंतांची मांदियाळी

भिवंडी : पुन्हा शिवाजीराजे भोसले, याच साठी केला होता अट्टाहास या चित्रपटाच्या जाहिराती निमित्ताने चित्रपट, लेखक, निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली चित्रपट कलावंत सिध्दार्थ जाधव, सिध्दार्थ बोडके, मंगेश देसाई, त्रिशा ठोसर, पृथ्वीक प्रताप, भार्गव जगताप, विक्रम गायकवाड, संदीप जुवतकर, निलश्री ज्ञानलक्ष्मी यांनी भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ या ठिकाणी महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत मुजरा केला. आपण जे अन्न खातो, जो पिकवतो त्या शेतकऱ्यासाठी बनवलेला सदर सिनेमा आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील बळीराजाची परिस्थिती बिकट आहे. आजही शेतकरी आत्महत्या करीत आहे. विदर्भात ६ शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव न मिळाल्याने आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांचे सत्र कधी थांबणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात जनजागृती व्हावी. सरकार आपल्या परीने जे करायचे ते करते. कर्जमाफी मदत करते; पण या चित्रपटाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांना उत्तेजीत करता आले तर माझा चित्रपट बनवण्याच्या हेतू साध्य झाला, असे मी समजेल. शेतकऱ्याला आत्महत्या करु देणार नाहीत, असा हेतू चित्रपट बनवण्यामागे असल्याची प्रतिक्रिया चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिली.

मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ सर्वसामान्य शेतकरी वर्गाने आपल्या मेहनतीने शासन मदतीशिवाय उभारलेले मंदिर आहे. याचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. आम्ही या शक्तिपीठावर दर्शनासाठी आलो नसतो तर आमच्या चित्रपटासाठी ती उणीव राहिली असती, अशी प्रांजळ कबुली महेश मांजरेकर यांनी दिली.

यावेळी ‘शिवक्रांती प्रतिष्ठान'चे संस्थापक राजुभाऊ चौधरी यांनी महेश मांजरेकर, सिध्दार्थ जाधव आणि इतर सर्व कलावंतांचा पुष्पगुच्छ आणि शक्तिपीठाची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. तर ‘शिवक्रांती प्रतिष्ठान'च्या वतीने भिवंडी, वाडा, शहापूर या ३ तालुका मर्यादित किल्ले बनविण्याच्या स्पर्धेचा बक्षीस वितरण महेश मांजरेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यामध्ये कट्टा बॉईज ग्रुप-वज्रेश्वरी, भैरवकृपा ग्रुप-कोंबडपाडा, ताडोबा ग्रुप वासिंद या मंडळांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त शक्तिपीठ परिसरात उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई