भातशेतीच्या कामांना वेग; शेतकऱ्यांची भातपेरणीची लगबग
भिवंडी : मे महिन्यात सुरु झालेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांसह शेतकऱ्यांची आर्थिकदृष्ट्या पुरती दशा केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्यात ‘मान्सून'ची वाटचाल संथगतीने सुरु झालेली असतानाच सद्यस्थितीत पावसाच्या सरी खंडाने कोसळत असल्या तरी खरीप हंगामातील भात शेतीकरिता पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे पूर्ण करुन भात पेरणीच्या कामांना जोमाने सुरुवात केल्याचे ८ जून रोजी भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात दिसून आले आहे.
यासाठी बळीराजाने भात बियाणे पेरणी करुन बियाणे शेतात रुतण्यासाठी आणि जमीन चारही बाजुंनी समांतर करण्यासाठी ४ मजबूत काड्यांचा चौकोनी (झीट) तयार करत तो शेतात फिरवून वेगवेगळ्या भात प्रकारातील भातबियाणांची रोवणी केली आहे. भिवंडी तालुक्यातील भात पिकाचे क्षेत्र १६८०० हेक्टर असून यावर्षी १०० टक्के भात लागवड होण्याची शक्यता भिवंडी तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे हवामान विभागाने यंदा ‘मान्सून'ची वाटचाल केरळ पाठोपाठ महाराष्ट्रात लवकर सुरु होणार असल्याचे भाकित केले होते. त्याप्रमाणे सुरुवात देखील झाली. परंतु, त्यानंतर पावसाने एकाकी पाठ फिरवली आहे. असे असले तरीही मागील काही दिवसांपासून अधून मधून बरसणारा पाऊस शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ८ जून रोजी खरीप हंगामातील भातशेतीच्या बियाणे पेरणीच्या कामांना वेग आल्याचे दिसून आले. असे असले तरी पाऊस हवामान विभागाच्या रामभरोसे ‘अंदाज'नुसार कोसळणार की, निसर्गाच्या नियमानुसारच बरसून बळीराजा समाधानी होणार, ते पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.