वोटचोरी विरोधात ‘काँग्रेस'चा मशाल मोर्चा

कल्याण : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी ‘भाजपा'कडून मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाल्याचा आरोप करत त्याच्या विरोधात कल्याणमध्ये ‘काँग्रेस'तर्फे मशाल मोर्चा काढण्यात आला.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ‘भाजपा'ने ‘निवडणूक आयोग'वर दबाव टाकून त्यांच्या मदतीने मतदार यादीमध्ये फेरफार करुन मतांची चोरी करत सत्ता मिळवल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. या मतचोरी विरोधात संपूर्ण देशभरात स्थानिक पातळीवर आंदोलन छेडण्याचे निर्देश राहुल गांधी यांनी दिले असून त्याअनुषंगाने ‘काँग्रेस'चे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली कल्याणमध्ये मशाल मोर्चा काढण्यात आला. कल्याण स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मार्च काढण्यात आला. यावेळी हातामध्ये मशाल घेऊन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

यामध्ये ‘काँग्रेस'चे प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, नविन सिंग, प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, काँग्रेस कमिटी सदस्य मुन्ना तिवारी, ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ पातकर, अल्पसंख्यांक विभागाचे शकील खान, ‘युवक काँग्रेस'चे जपजित सिंग यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत जे दाखले दिले, त्याचा अर्थ नरेंद्र मोदी वोटचोरी करून देशाचे पंतप्रधान झाले असून या वोटचोरीमुळे देशाची वाट लागली असल्याचा आरोप यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केला. तसेच येणाऱ्या महापालिका निवडणुकीत अशा प्रकारची वोट चोरी आम्ही होऊन देणार नाही आणि याहीपेक्षा जोरदार आंदोलन आम्ही करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘राष्ट्रवादी'चा ‘सिडको'वर धडक मोर्चा