‘शेकाप'तर्फे ६१० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

नवीन पनवेल : शेतकरी कामगार पक्ष आणि बाळूशेठ पाटील सोशल वेल्फेअर संस्था यांच्या वतीने १९ जून रोजी पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये पनवेल तालुक्यामधील पनवेल, खांदा कॉलनी, कलंबोली, कामोठे, खारघर आणि पनवेल ग्रामीण मधील इयत्ता बारावी आणि दहावी परीक्षामध्ये उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या ६१०  विद्यार्थ्याचा आणि ६७ शिष्यवृत्ती उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार बाळाराम पाटील होते. तर व्यासपीठावर ‘कृषी उत्पन्न बाजार समिती'चे सभापती नारायणशेठ घरत, पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशिनाथ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, काँग्रेस पनवेल अध्यक्ष सुदाम पाटील, ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, ‘शेकाप पुरोगामी शिक्षक संघटना'चे जिल्हाध्यक्ष रा. गो. पाटील, ‘पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती'चे संचालक देवेंद्र मढवी, जी. आर. पाटील आदि उपस्थित होते.

याच कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी इतिहास तज्ञ तथा करियर मार्गदर्शक प्रशांत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशांत देशमुख यांनी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी पालकांनी कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांना असणारी आवड लक्षात घेऊन त्याचप्रमाणे त्यांचे करिअर घडवावे, असे सांगितले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल महापालिका जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी आणि ‘बाळूशेठ पाटील सोशल वेल्फेअर संस्था'चे कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वाईन शॉप विरोधात खारघरवासीय आक्रमक