नवी मुंबई महापालिका आयुक्त निवासस्थान पत्त्यावर १५० मतदारांची नोंद

नवी मुंबई : मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार नावांच्या विरोधात महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक झाली आहे. त्याअनुषंगाने येत्या १ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाविरोधात येत्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सर्वच विरोधी पक्षांकडून जय्यत तयारी सुरु असतानाच नवी मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. दस्तुरखुद्द नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या नेरुळ मधील आयुक्त निवासस्थानाच्या पत्यावर तब्बल १५० मतदारांच्या नावांची नोंद करण्यात आली आहे. सदर बाब ‘मनसे'चे नेते गजानन काळे यांनी उघड केली आहे.

दरम्यान, या आधी ‘मनसे'नेच महापालिका सार्वजनिक शौचालयात मतदारांची नोंद उघडकीस आणली आहे. तर पामबीच रोडवर नोंदणी केलेल्या २५० मतदारांपैकी एकही मतदार नमूद केलेल्या पत्यावर आढळलेला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कारभारावर कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्तांचे निवासस्थान नेरुळ पूर्व रेल्वे स्थानकासमोर असून या पत्त्यावर तब्बल १५० मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मतदार यांद्यामधील १५० मतदारांचा पत्ता नेरुळ रेल्वे स्टेशन, महापालिका आयुक्त निवास असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांचे निवासस्थान असलेल्या पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्याने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कारभारोवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या आधी सार्वजनिक शौचालयात मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही ‘मनसे'ने समोर आला आहे. जुईनगर, सेक्टर-२३ येथील रेल्वे हॉस्पिटल जवळ नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयात मतदाराची नोंद केल्याची बाब समोर आणत ‘मनसे'ने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर शौचालयात मतदाराची नोंदणी केल्याचा आरोप केला आहे. तसेच बोगस १५ हजार आणि दुबार १८ हजार नावे वगळण्याची मागणी ‘मनसे'च्या वतीने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दरम्यान, मतदार याद्यांमधील घोळाबद्दल महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक झाली आहे. ‘राष्ट्रवादी'तर्फे शरद पवार, ‘शिवसेना उबाठा' पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन आयोगाला मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ दुरुस्त केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेऊ नका, असे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीेन १ नोव्हेंबर रोजी सत्याचा मोर्चाचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे.   

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे