पर्यावरणपूरक होळी साजरी करा
नवी मुंबई : मानवी समाजातील एकोपा वाढावा, तणावमुक्ती व्हावी आणि सर्वांना आनंद मिळावा यासाठी सण-उत्सव, समारंभ साजरे करणे महत्त्वाचे आहे. मात्र, सण-उत्सव, समारंभ साजरे करताना पर्यावरणाचे संतुलन अबाधित राहील याचे भान ठेवणे आणि काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.
होळी सण साजरा करत असताना रासायनिक रंगाने रंगपंचमी खेळली जाते. त्यामुळे पाण्याचा अनाठायी अपव्यय तर होतोच; शिवाय रासायनिक रंगामुळे त्वचेला आणि डोळ्याला गंभीर इजा होण्याचा मोठा धोकाही संभवतो. तसेच होळी सणादरम्यान लाईव्ह म्युझिक इव्हेंटस्मध्ये ध्वनी प्रणालीमुळे ध्वनी प्रदुषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
‘ध्वनी प्रदुषण'मुळे मनुष्य आणि प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो. ध्वनीची पातळी वाढल्यानंतर माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात. तसेच लक्ष विचलित होते, चिडचिड होते, कार्यक्षमता घटते आणि पचनक्रियेत बदल होतो. सतत होणाऱ्या ‘ध्वनी प्रदुषण'मुळे बहिरेपणाही येतो. सतत १६०-१८० डेसिबल आवाजामध्ये मृत्युही होण्याची शक्यता असते.
ध्वनी प्रदुषण एक गंभीर समस्या असून पर्यावरणीय आरोग्य समस्या मानली जाते. त्यामुळे ध्वनी प्रदूषण एक गुन्हा असून ध्वनी प्रदुषण प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा ध्वनी प्रदुषण आणि त्याचे परिणाम कमी करण्याच्या उद्देशाने बनविण्यात आला आहे.
ध्वनी प्रदुषण कायद्याचे उल्लंघन केल्यास ५ वर्षे कैद किंवा १ लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. तसेच शिक्षा होऊनही पुन्हा उल्लंघन सुरू ठेवल्यास प्रत्येक दिवसाला ५ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कलम १५ (१) नुसार शिक्षा झाल्यापासून १ वर्षापर्यंतच्या काळात पुन्हा असा गुन्हा केल्यास ७ वर्षापर्यंतची शिक्षेची कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.
होळी सणादरम्यान विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून, गृहसंकुलांकडून तसेच राजकीय पक्षांकडून होळी दहनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जातात. यावेळी सहजरित्या लाकडांचा वापर करुन ठिकठिकाणी होलिका दहन केले जाते. तसेच लाकडांचा वापर केल्याने धुरामुळे ‘वायू प्रदुषण'मध्ये देखील वाढ होते. अनेकदा आग लागण्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. तसेच जीवित आणि वित्त हानी होण्याची घटना संभवते, तर होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या धुलीवंदनाच्या दिवशी अनेकदा रासायनिक रंगांचा वापर करणे, पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणे तसेच महिलांशी गैरवर्तन करणे यासारखी अनेक गैरकृत्ये केली जातात. याला आळा बसावा म्हणून ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने २० मार्च पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत.
महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान ५.०', ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान' अंतर्गत फटाकेमुक्त, प्लास्टिकमुक्त, कचरामुक्त, प्रदुषणमुक्त आणिपर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिव्हल) सण-उत्सव साजरे करणे अपेक्षित आहे. त्यानुसार सदर अभियानांतर्गत नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा. सण समारंभामध्ये टाकाऊ वस्तुंचा आणि पुनर्वापर करण्यायोग्य वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करावा आणि पर्यावरणपूरक, प्रदुषणमुक्त सण साजरे करावेत, असे आवाहन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
होळीचे तेजस्वी रंग नागरिकांच्या आयुष्यात आनंद आणि समृध्दी आणोत. रंगांच्या या सणात हृदय प्रेमाने आणि जीवन हास्याने भरुन जावो. होळीचा सण सर्वांनी पर्यावरणाचे भान राखून साजरा करुया.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.