पर्यावरण दिनी सानपाडा मध्ये वृक्षारोपण, शिववृक्ष रोपे-कापडी पिशवी वाटप

नवी मुंबई : पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिन यांचे औचित्य साधून ‘शिववृक्ष -पर्यावरणाचे हरित शिवस्वराज्य' या शिर्षकअंतर्गत आगळा-वेगळा आणि शिवराज्याभिषेक दिनाचा प्रेरणादायी उपक्रम सानपाडा मध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.या उपक्रमामध्ये पर्यावरण संवर्धन आणि शिवप्रेरणेचा संगम साधत नागरिकांमध्ये हरित जाणीव जागवण्यात आली.

सानपाडा मधील सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाजी कचरे यांच्या पुढाकारातून, नवी मुंबई महापालिका, विवेकानंद संकुल, शिवप्रतिष्ठान सानपाडा, शिवतेज मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवासी संघ, common citizen association sector 4 Nerul यांच्या संगनमताने आणि सक्रिय सहभागातून सदर उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

या कार्यक्रमात महापालिका तुर्भे विभाग स्वच्छता अधिकारी जयेश पाटील, सुषमा देवधर, उद्यान निरीक्षक संदीप मोटे, ‘शिवतेज मित्र मंडळ'चे सदस्य सागर गाडगे, ‘शिवप्रतिष्ठान'चे सदस्य सुरज सावंत, पोलीस उपनिरीक्षक सतीश माने यांच्यासह स्थानिक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक-युवती यांच्यासह विवेकानंद शिक्षण संकुल मधील सर्व प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, या उपक्रमात सक्रिय सहभागी झालेल्या विवेकानंद संकुल मधील सर्व प्राध्यापकांच्या हस्ते प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यात आले. यामुळे वृक्षारोपण उपक्रम केवळ सामाजिक नव्हे तर शैक्षणिक दृष्टीनेही महत्त्वाचा ठरला.

या उपक्रमात वड, पिंपळ, आंबा, फणस, पेरु, जांभूळ आदी पारंपरिक, दीर्घायुषी आणि पर्यावरणपूरक वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपण उपक्रमात ‘जितकी झाडे जगवू शकतो, तितकीच लावूया' या विचारावर विशेष भर देण्यात आला. याशिवाय प्रत्येक वृक्ष ‘एक गड' समजून त्याचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.

याप्रसंगी विवेकानंद संकुल मधील प्राध्यापक मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थितांनी पर्यावरण आणि परिवार संवर्धनाची शपथ घेतली. ‘पर्यावरण म्हणजेच आपला परिवार', असा संदेश या माध्यमातून ठसवण्यात आला.

यावेळी सर्व उपस्थितांना ‘गो ग्रीन' संदेशासह कापडी पिशव्यांचे वितरण करुन ‘एक व्यक्ती-एक वृक्ष' या संकल्पनेतून वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.

पर्यावरण दिनी सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी समाजात ‘शिववृक्ष' संकल्पना रुजवून पर्यावरण संवर्धन हेच खरे शिवस्वराज्याचे रुप आहे, हाच आदर्श निर्माण केला आहे. शिववृक्ष उपक्रम तरुणांसाठी प्रेरणादायी तसेच सामाजिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक पातळीवर स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम ठरला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड-किल्ले जपले, आपण झाडे जपली पाहिजेत', हेच आजचे हरित स्वराज्य!, आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी निलेश कचरे यांनी व्यवत केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बीजमोदक रंगावलीतून पर्यावरण जपणुकीचा संदेश