‘घरोघरी तिरंगा’ मोहीमेंतर्गत सार्वजनिक स्थळांची लोकसहभागातून स्वच्छता
नवी मुंबई : तिरंग्याविषयीचा राष्ट्राभिमान जागृत करणा-या घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत विविध विभागांमध्ये महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीमा राबविण्यात आल्या. स्वच्छ सर्वेक्षण 2025 अंतर्गत आयोजित या मोहीमा अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व स्मिता काळे आणि परिमंडळ 1 उपआयुक्त सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 उपआयुक्त संजय शिंदे व मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे यांच्या निरीक्षणाखाली राबविण्यात आल्या.
यामध्ये बेलापूर व नेरूळ विभागांनी संयुक्तपणे ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात प्रभावी रितीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेमध्ये 52 गोणी कचरा संकलित करण्यात आला. यामध्ये एसआयईएस महाविद्यालयाचे एनएसएस युनिटचे विद्यार्थी, नागरिक तसेच स्वच्छताकर्मी सहभागी होते.
वाशी मिनी सी शोअर जुहूगाव चौपाटी परिसरात टिळक कॉलेजचे एनएसएस विद्यार्थी यांच्या सहयोगातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये स्वच्छताकर्मींसोबत नागरिकही सहभागी झाले होते.
तुर्भे विभागात सेक्टर 10 सानपाडा येथील ट्री बेल्ट परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत पिल्लाई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होत नागरिक व स्वच्छताकर्मींसह सखोल स्वच्छता मोहीम यशस्वी केली.
कोपरखैरणे सेक्टर 19 खाडी रोडवर सखोल स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
या स्वच्छता मोहीमेत प्राधान्याने प्लास्टिक बाटल्या, रॅपर्स, प्लास्टिक पिशव्या व सिंगल यूज प्लास्टिक, कापड, कागद अशा स्वरुपाचा कचरा संकलीत करण्यात आला व गोण्यांमध्ये भरुन महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला. यावेळी स्वच्छतेची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली.