‘केडीएमसी'च्या ६१ शाळांमध्ये पायाभूत चाचणीला प्रारंभ
कल्याण : महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षकांच्या मदतीने महापालिकेच्या शाळांचा पूर्णतः कायापालट करण्यासाठी कंबर कसली आहे. यावर्षी शाळा प्रवेशाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तके पुरविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गणवेश, बुट, दपतरे, आदि आवश्यक सुविधा देखील वर्षाच्या सुरुवातीला पुरविण्याचे नियोजन आहे. आता, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा बौधिक स्तर वाढविण्यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती पाहण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांतून विद्यार्थ्यांच्या पायाभूत चाचणीला ३० जून रोजी प्रारंभ झाला आहे.
महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशान्वये प्रत्येक शाळानिहाय पालक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. या पालक अधिकाऱ्यांनी स्वतः शाळेत जावून, शाळेत घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीची पाहणी केली. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पालकत्व स्विकारलेल्या सिंडेकेट येथील शाळा क्र.९५/८ या ऊर्दु शाळेतील तसेच बारावे येथील शाळा क्र.६८ आणि बारदान गल्ली येथील ऊर्दु आणि मराठी शाळेस समक्ष भेट देवून शाळेत चाललेल्या पायाभूत चाचणी परीक्षेची पाहणी करीत स्वतः खडू हातात घेवून विद्यार्थ्यांना शिकवण दिली.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा बौधिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून पायाभूत चाचणी घेतली जात असून, यानंतर सर्व शिक्षकांसाठी ‘शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाणार असून या ‘शिक्षण परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचा बौधिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून करावयाच्या विविध प्रकारच्या उपायांच्या अंमलबजावणीबाबत ऊहापोह केला जाणार आहे.
दरम्यान, यापुढे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचाविण्यासाठी दरमहा पायाभूत चाचणी घेवून, बौधिक स्तर वाढविण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केले जातील. महापालिकेच्या या अभिनव संकल्पनेचे शिक्षकांनी देखील कौतुक केले आहे.