हेदोरावाडी आदिवासी पाडा मध्ये पाणी टंचाई

खारघर : खारघर मधील हेदोरावाडी पाड्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नियमित  पाणी पुरवठा होत नसल्याने आणि  बोअरवेल बंद असल्याने महिलांना पाण्यासाठी वन-वन भटकावे लागत असून, पनवेल महापालिका प्रशासनाने वेळीच पाणी टंचाईवर उपाययोजना करावी, अशी मागणी  हेदोरावाडी ग्रामस्थांकडून केली जात आहे.  

खारघर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांना पाणी टँकर मागवावा लागत आहे.

दरम्यान, खारघर सेक्टर-५ मधील डोंगर पायथ्याशी असलेल्या हेडोरावाडी आदिवासी पाड्यात पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध होत नाही.  तसेच बोअरवेल बंद असल्यामुळे  हेदोरावाडी मधील महिला, मुले-मुली यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.  हेदोरावाडी आदिवासी पाड्यात जवळपास ५० घरे आहेत.  हेदोरावाडी पाड्यातील पाणी समस्या दूर करण्यासाठी खारघर ग्रामपंचायत तर्फे  हेदोरावाडी पाड्यात भूमिगत जलकुंभ उभारण्यात आला आहे. या जलकुंभ मध्ये  सिडकोकडून जलवाहिनीद्वारे  पाणी उपलब्ध होत होते.  हेदोरावाडी ग्रामस्थांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मोटार पंपची सोय देखील करण्यात आली होती.  मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून, भूमिगत टांकीतील मोटार पंप अनेक दिवसापासून बंद आहे. दुसरीकडे काही महिन्यांपासून बोअरवेल बंद असल्यामुळे हेदोरावाडी ग्रामस्थांना जवळपास असलेल्या उद्यानातील   नळावर तसेच एका खाजगी  समाजमंदिर पदाधिकाऱ्यांना विनंती करुन पाणी मिळवून पाण्याची गरज  हेदोरावाडी मधील नागरिकांना करावी लागत आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठा करण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी, अशी मागणी  हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील रहिवाशांद्वारे केली जात आहे.

तात्काळ कर्मचारी पाठवून हेदोरावाडी आदिवासी पाड्यातील पाणी टंचाई समस्या दूर केली जाणार आहे. - विलास चव्हाण, पाणी पुरवठा अधिकारी - पनवेल महापालिका.

हेदोरावाडी पाड्यातील बोअरवेल बंद आहे. सिडकोकडून पाणी पुरवठा होत नसल्याने महिला पाड्यालगत असलेल्या इमारती आणि उद्यानात असलेल्या नळातून पाण्याचे एक-दोन हंडे पाणी मिळवून पाण्याची गरज पूर्ण करीत आहेत. पनवेल महापालिकेने हेदोरावाडी आदिवासी पाडयातील पाणी समस्या दूर करण्याची आवश्यकता आहे. - भगवान सपरा, रहिवाशी -हेदोरावाडी, खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवकाळी पावसाने झोडपले