ठाणे जिल्ह्यातील महापालिका, जिल्ह्यातील नगरपालिकांच्या पायाभूत सुविधांसाठी भरीव निधीची गरज

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील ठाणे महापालिकेसह कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई या महापालिका आणि जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापन, परिवहन सेवा यासह विविध पायाभूत सुविधांसाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करण्याची शिफारस ‘ठाणे'चे खासदार नरेश म्हस्के यांनी १६ व्या ‘वित्त आयोग'च्या बैठकीत केली. तसेच सर्व सूचना, विविध विषय, निधी मिळण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व महापालिका आणि नागरपालिका यांच्या वतीने राज्य सरकार तर्फे मागण्यांचे निवेदन खासदार नरेश म्हस्के यांच्यामार्फत देण्यात आले. 

१६व्या ‘वित्त आयोग'कडून राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी वितरणाबाबत शिफारसी करण्यासाठी ‘आयोग'चे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढीया यांच्या अध्यक्षतेखाली १३ सदस्यीय समितीची बैठक ८ मे रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. ठाणे महापालिकेच्या वतीने माजी महापौर तथा विद्यमान खासदार नरेश म्हस्के यांना बैठकीसाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी खासदार म्हस्के यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघातील तसेच रायगड जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांसाठी भरीव निधीची तरतूद करण्याचा मुद्दा लावून धरला.

बैठकीमध्ये सर्वप्रथम खा. नरेश म्हस्के यांनी १५ व्या ‘वित्त आयोग'च्या शिफारसीनुसार उपलब्ध झालेल्या निधीबद्दल ‘आयोग'चे तसेच केंद्र शासनाचे आभार मानले. ठाणे महापालिका क्षेत्र तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील महापालिका, नगरपालिका यांना पाणीपुरवठा, मलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संलग्न उपाययोजना करण्यासाठी ‘आयोग'कडून निधी उपलब्ध झाला. त्यामुळे सर्वच महापालिका क्षेत्रात विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प राबविता आले. या प्रकल्पामुळे शहरांच्या विकासास निश्चित हातभार लागलेला असून यामुळे नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली असल्याचे खासदार म्हस्के म्हणाले.  

1६व्या वित्त आयोगाकडून ठाणे महापालिका क्षेत्र व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील महापालिका, नगरपालिका यांना पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, मलजल वाहिनी व्यवस्था, अग्निशमन तसेच आपत्कालीन व्यवस्थापनासाठी निधी, आरोग्य विषयक उपाययोजना, सौर ऊर्जा योजना, तलाव संरक्षण, वाहन-पार्किंग व्यवस्था आदि योजनांसाठी भरीव निधी उपलब्ध व्हावा, अशी शिफारस खा. नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

नवी मुंबई विमानतळ दर्जेदार कनेक्टिव्हिटी