एपीएमसी फळ बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात
वाशीः पावसाळा संपताच थंडीची चाहूल लागल्यावर बाजारात स्ट्रॉबेरी दाखल होण्यास सुरुवात होत असते. यंदा पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकांवर परिणाम झाला असला तरी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात तुरळक स्वरुपात स्ट्रॉबेरी आवक सुरु झाली आहे. पाडव्यापासून एपीएमसी फळ बाजारात ५० ते ६० बॉक्स स्ट्रॉबेरी दाखल होत असून, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात स्ट्रॉबेरी आवक वाढून मुख्य स्ट्रॉबेरी हंगामाला सुरुवात होईल, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी दिली.
स्ट्रॉबेरी फळ अनेक प्रकारे गुणकारी आहे. स्ट्रॉबेरी फळात भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, रक्तातील साखर नियंत्रणात मदत करतात आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याशिवाय त्वचेसाठीही स्ट्रॉबेरी फळाचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे बाजारात स्ट्रॉबेरी फळाला अधिक मागणी असते. वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरी हंगामाला सुरुवात होते.सातारा पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातून देखील स्ट्रॉबेरी फळाची आवक होत असते. मात्र, सातारा मधील स्ट्रॉबेरी चवीला अधिक गोड आणि आकारात देखील मोठी भेटत असल्याने ग्राहकांची या स्ट्रॉबेरी फळाला अधिक पसंती असते. यंदा, मात्र सातारा जिल्ह्यात पाऊस अधिक पडल्याने बऱ्याच प्रमाणात स्ट्रॉबेरी फळ पिक वाया गेले.त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पीक घेतल्याने उत्पादन येण्यास थोडा अवधी लागणार असून, येत्या नोव्हेंबर मध्ये स्ट्रॉबेरी फळाची आवक वाढण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतरच मुख्य स्ट्रॉबेरी फळाच्या हंगामाला सुरुवात होणार आहे.
सध्या एपीएमसी फळ बाजारात पाडव्यापासून तुरळक ५० ते ६० बॉक्स स्ट्रॉबेरी दाखल होत असून, प्रतिकिलो ६०० ते ७०० रुपये दराने स्ट्रॉबेरी विक्री होत आहे, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली.