शौर्या अंबुरे आशियाई स्पर्धेत चमकली
ठाणेः एशियन युथ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा-२०२५ यावर्षी दम्माम, सौदी अरेबिया येथे १५ ते १८ एप्रिल दरम्यान घेण्यात आल्या. या स्पर्धेत ३० आशियाई देशातील खेळाडुंचा सहभाग होता .
सदर क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाकडून ३६ मुलांची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्राकडून ठाणे येथील शौर्या अंबुरे (१०० मीटर अडथळा शर्यत) आणि नवी मुंबईची आंचल पाटील (उंच उडी) यांची निवड करण्यात आली होती. शौर्या अंबुरे हिने सदर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत निवड फेरीत १३.८५ सेकंदात स्पर्धा संपवून स्वतःची चांगली कामगिरी करीत स्पर्धा सर्वात कमी वेळेत पूर्ण केली.
मुलींच्या अंतिम १०० मीटर अडथळा शर्यतीमध्ये शौर्या हिने शर्थीने लढत देत कांस्य पदक पटकावले. अंतिम स्पर्धेत तिने १३.८ सेकंदात स्पर्धा संपवून चांगली कामगिरी केली आहे.
आशियाई स्पर्धेत महाराष्ट्राला एकमेव मेडल मिळवून देणाऱ्या शौर्या हिचे क्रीडा जगतात विशेष कौतुक होत आहे. या विजयाने शौर्या सध्या १०० मीटर अडथळा स्पर्धेत जागतिक क्रमवारीत ४ थ्या क्रमांकावर आली आहे .
१५ वर्षीय शौर्या अंबुरे ठाणे मधील युनिव्हर्सल हाय शाळेची विद्यार्थिनी असून दहावी बोर्ड परीक्षेचा अभ्यास करुन तिने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे. ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी याच्यांकडून त्यांच्या एम्स ॲकॅडमी मध्ये गेली ९ वर्ष प्रशिक्षण घेत आहे. अजित कुलकर्णी यांनी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू घडवले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या अनेक विद्यार्थी ठाणे मध्ये प्रशिक्षण घेत आहेत.