पनवेल मध्ये भाजपा स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः, अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या ‘भारतीय जनता पार्टी'चा ४६वा स्थापना दिन ६ एप्रिल रोजी पनवेल मध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

६ एप्रिल १९८० रोजी ‘भारतीय जनता पार्टी'ची सुरुवात झाली होती.भारतीय जनता पक्षाचे पूर्वीचे नाव जनसंघ होतं, जे १९७७ मध्ये जनता पक्षात विलीन झाले. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा भारतीय जनता पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जात आहे. स्थापना दिन अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन करुन भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते यांना संबोधित केले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुवयातील तोंडरे येथे, उत्तर रायगड जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी यांनी खारघर कार्यालयात, युवा नेते परेश ठाकूर, पनवेल शहर भाजपाध्यक्ष अनिल भगत यांनी पनवेल तालुका-शहर मध्यवर्ती कार्यालयात, पनवेल तालुका भाजपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स येथे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाईन संवादाचा लाभ घेतला.

‘भारतीय जनता पार्टी'च्या आजच्या यशासाठी कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या खचल्या आहेत. पक्ष नेतृत्वाने कार्यकर्ते, पदाधिकारी यांना ताकद दिल्याने प्रत्येक कार्यकर्त्यात पक्ष वाढीची जिद्द निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशल नेतृत्वात विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले. सध्या संघटनपर्वाच्या माध्यमातून भाजपा मजबूत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तब्बल १ कोटी ५१ लाख सदस्यांची नोंदणी झाली आहे. भारतीय राजकारणात भाजप आता केंद्रस्थानी असून, या स्थानावरुन ‘भाजपा'ला बेदखल करणे अन्य पक्षांसाठी सोपे नाही. एकेकाळी ज्या ‘भाजपा'ला राजकीय परिघाबाहेर ठेवण्यासाठी विरोधकांनी आटापिटा केला, त्याच ‘भाजपा'ने सिध्द केलेल्या विषय सूचीवर देश प्रगती करत आहे. देशाचे सक्षम नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र-राज्यातील भाजपा लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेसाठी दूरदृष्टीने काम करीत आहेत. त्यामुळेच भाजप आणि सर्वसामान्य माणूस यांचे नाते घट्ट झाले असून, त्याचकारणाने भाजप जगातील सर्वात मोठा आणि क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे, असे मनोगत आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यवत केले.

६ एप्रिल दिवस ‘भाजपा'चा स्थापना दिवस म्हणून देशभरात, राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि उत्तर रायगड  जिल्हा भाजपाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गर्शनाखाली पनवेल, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, खारघर तसेच पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात ‘भाजपा'चा स्थापना दिवस साजरा झाला. ‘भाजपा' स्थापना दिवस निमित्त जनसंपर्क कार्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ऑनलाईन मार्गदर्शनही प्रत्येक जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिल्ली मध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न