नवी मुंबईत जलाशयांची सखोल स्वच्छता
नवी मुंबई : उद्यानांचे शहर याप्रमाणेच तलावांचे शहर अशी देखील नवी मुंबईची वेगळी ओळख असून तलावांच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिले जाते. त्या अनुषंगाने ‘सफाई अपनाओ-बिमारी भगाओ‘सिडको' अभियान अंतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात जलाशय आणि जलाशयांच्या परिसर स्वच्छतेच्या मोहिमा उत्साहाने राबविण्यात आल्या.
अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या या जलाशय स्वच्छता विशेष मोहिमेमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे, स्मिता काळे आणि परिमंडळ-१ उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२ उपायुक्त संजय शिंदे यांच्या माध्यमातून सर्वच विभागांमध्ये प्रभावी कार्यवाही करण्यात आली.
मोहिमेंतर्गत जलाशयांमध्ये तरापयांद्वारे जाऊन जलाशयावर तरंगणारा कचरा जाळीच्या सहाय्याने संकलित करण्यात आला. तसेच जलाशयांच्या किनाऱ्यावरील जमिनींचा पावसामुळे शेवाळयुक्त झालेला परिसर पावडर टाकून स्वच्छ करण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना जलाशयात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन करण्यात आले.
बेलापूर विभागात सेवटर-२० बेलापूर गांव अमृतेश्वर तलाव, आग्रोळी तलाव, करावे तलाव, दारावे तलाव या जलाशयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जलाशयाच्या काठावर आणि पाण्यावर तरंगणारा कचरा काढून टाकण्यात आला. नेरुळ विभागातही चिंचोली तलावाचा जलाशय आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. अधिकारी, कर्मचारी, स्वच्छतामित्र आणि नागरिक यांच्या सहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
वाशी विभागात सेक्टर-७ जागृतेश्वर मंदिर तलाव आणि परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली. तुर्भे विभागात सेवटर-२६ कोपरी तलाव, तुर्भे गांव तलाव, खोकड तलाव सानपाडा याठिकाणी जलाशयांची सखोल स्वच्छता करण्यात आली. कोपरखैरणे मध्ये सेक्टर-१९ येथील धारण तलाव, खैरणे तलाव आणि महापे तलाव याठिकाणी स्वच्छताकर्मींनी उपस्थित नागरिकांच्या सहयोगाने जलाशय आणि परिसरांची सखोल स्वच्छता केली.
घणसोली विभागात रबाले तलाव, स्व. राजीव गांधी खदाण तलाव गोठिवली, छत्रपती शिवाजी महाराज तलाव, गुणाली तलाव या ठिकाणी, ऐरोली सेक्टर-२० खाडी तलाव, ऐरोली तलाव येथे तर दिघा विभागातही श्रीगणपती तलाव येथे जलाशयाची आणि परिसराची नागरिकांच्या सहयोगाने सखोल स्वच्छता करण्यात आली.
‘सफाई आपनाओ-बिमारी भगाओ' अभियानांतर्गत स्वच्छता विषयक छोट्या छोट्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष देत विविध ठिकाणी स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार जलाशयांच्या स्वच्छता मोहीमा सर्वत्र यशस्वीपणे राबविण्यात आल्या. यापुढील काळातही नानाविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार असून त्यामध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
-डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.