महापालिका प्रभाग रचनेकडे भिवंडीकरांचे लक्ष

भिवंडी : विधानसभा निवडणुकीनंतर बहुप्रतिक्षीत महापालिका-नगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना राज्याच्या प्रशासकीय पातळीवरुन सुरुवात झाली असून ड-वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश भिवंडी महापालिकेला ११जुलै रोजी मिळाले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या निवडणुक कार्यालयात कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु झाली असून शासन निर्देशानुसार भिवंडी महापालिकेच्या नवीन प्रभाग रचनेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

भिवंडी महापालिका ड-वर्ग महापालिका असून सन २०११ साली केलेल्या शहराच्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्राच्या हद्दीतील नागरिकांची लोकसंख्या सुमारे ७ लाख ९ हजारापेक्षा जास्त आहे. मात्र, गेल्या १४ वर्षात शहरात झालेल्या विकासानुसार येथील लोकसंख्या वाढली आहे. त्यानुसार नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांना अपेक्षित मूलभूत सुविधा मिळत नाही. तर स्थानिक काही लोकप्रतिनिधींनी गेल्या १० वर्षात शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करुन घेतला. मात्र, महापालिका क-वर्गामध्ये नेऊ शकले नाही. तर काही लोकप्रतिनिधी नगरपालिका ड-मध्ये रहावी याच मानसिकमध्ये राहून शहराची स्थिती ‘जैसे थे' ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून येते.

यापूर्वी राज्य शासनाने २०२२ मध्ये निवडणूक घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशानुसार ३ वॉर्ड सदस्यांचा एक प्रभाग बनविला होता. त्यानुसार अंतिम यादी देखील तयार करून शासनाकडे पाठविली होती. मात्र, कोर्टाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार शासनाने महापालिकांच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात केली आहे. त्यानुसार भिवंडी महापालिका प्रशासनास प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत. सदर  आदेशानुसार नुसार प्रत्येक प्रभागात ४ सदस्य राहणार आहेत. सर्वच प्रभाग ४ सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग ३ अथवा ५ सदस्यांचा होईल. अथवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे होतील.तसेच भौगोलिक सलगता राखण्याच्या दृष्टीने प्रभाग रचना करताना नागरिकांची गैरसोय टाळता येईल अशा ठिकाणी असावेत, असे शासनाने आदेशात नमूद केले आहे. तसेच शासनाने दिलेल्या आदेशानुसार प्रभागाची सरासरी लोकसंख्या, सदस्य संख्या, प्रभागाची संख्या, प्रभाग रचनेसाठी मार्गदर्शक तत्वे, प्रभागाच्या सीमारेषा, प्रभागाचे गुगल मॅप प्रमाणे नकाशे आदिंबाबत प्रारुप रचनेसाठी सूचना आणि निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यालयात निवडणूक निमित्ताने हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते आणि पुढारी केवळ भेटीगाठी आणि चर्चेवर भर देत होते. मागील निवडणुकीत भिवंडी महापालिकेचे एकूण ९० नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये ४५ पुरुष आणि ४५ महिला नगरसेविका यांचा समावेश होता. त्यावेळी एकूण ४ वार्ड सदस्यांचा एक प्रभाग होता. त्यामुळे २१ प्रभाग ४ सदस्यांचे आणि २ प्रभाग ३ सदस्यांचे होते. आता प्रभाग रचना नव्याने होणार असल्याने सत्तेचे गणित मांडणाऱ्या अपक्ष नगरसेवकांच्या आणि राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शहरातील समस्या ‘आ' वासून बसल्या असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या उमेदवारांना या aनिवडणुकीत चांगलाच फटका बसणार असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.  

सध्या प्राथमिक स्थितीत जनगणनेनुसार शासनाकडून प्रभाग रचना करण्याचे आदेश आले आहेत. निवडणूक निमित्ताने एकूण कार्यक्रमाचा तारखेनुसार प्रारुप, अंतिम यादी आणि प्रभाग जाहीर करण्याचा आराखडा शासनाकडून आलेला नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे शासनाचे आदेश उपलब्ध होतात, त्यानुसार कामाची सुरुवात झालेली आहे.
- अजित महाडिक, निवडणूक विभाग अधिकारी-भिवंडी महापालिका. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

अंबरनाथकरांना ‘मेट्रो'चे गिफ्ट चिखलोली येथे रेल्वे मेट्रो इंटीग्रेशन