जरांगे यांच्या आंदोलनाला मुदतवाढ
मुंबई : ‘मराठा आरक्षण'च्या मागणीसाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात हजाराेंच्या संख्येने उतरलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला पोलिसांनी दिलेली परवानगी संपली असून आता आज ३० ऑगस्टसाठी आंदोलकांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मराठा आंदोलकांकडून दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम-अटी पोलिसांकडून लावण्यात आल्या आहेत. त्यातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या परवानगीबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी चर्चा करुन १ दिवसाच्या मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आंदोलकांकडून २९ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या वाहतूक कोंडीबाबत काही नियम-अटींच्या पार्श्वभूमीवर आज ३० ऑगस्ट रोजी जरांगे यांच्या आंदोलनास परवागनी मिळणार की नाही? याची चर्चा सुरु असतानाच आता त्यांना एक दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. २९ ऑगस्ट रोजीच्या आंदोलनासाठी परवानगी मिळावी यासाठी आझाद मैदान पोलिसांकडे जरांगे यांच्याकडून अर्ज करण्यात आला होता. मनोज जरांगे यांच्या आंदोलनास मुदतवाढीची परवानगी दिली असून झालेला प्रकार पाहता काही नियम-अटी त्यात असणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाच्या प्रांरणी भाषण करताना आंदोलनाबाबत भूमिका मांडली होती. पोलिसांकडे परवानगी वाढवून मिळण्यासाठी विनंती अर्ज केल्याचेही सांगितले होते. त्यानुसार, त्यांच्या आंदोलनास मुदतवाढ देण्यात आली आहे.
वाहतूक कोडींकडे पोलिसांचे बोट...
जरांगे पाटील यांच्या आंदोलनात नियमापेक्षा जास्त संख्येने मराठा बांधव उपस्थित होते. तर वाहतूक कोंडी होणार नाही याची हमी देऊनही वाहने रस्त्यात उभी करत वाहत कोंडी करण्यात आली. काही ठिकाणी जाणीवपूर्वक आंदोलक वाहने अडवून धरत होते. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होईल या परिस्थितीनुसार आंदोलकांकडून पाऊले उचलली जात होती, या सर्व परिस्थितीकडे बोट दाखवत नियम-अटींच्या आधारे पोलिसांकडून पुढील मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.