गुलाबी नाल्याचे उलगडले रहस्य
डोंबिवलीः डोंबिवली मध्ये एमआयडीसीतील कंपनीने केमिकल रंगमिश्रीत पाणी नाल्यात सोडल्याचा व्हिडीओ वायरल झाला होता. त्यामागील सत्य शोधण्याकरिता शिवसेना कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, सागर जेधे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यात नाल्याचे पाणी कंपनीत प्रिंटींग आणि लेदर प्रिंटिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगामुळे नाला गुलाबी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दोन दिवस संततधार पाऊस पडत असल्यामुळे एमआयडीसी परिसरात पाणी तुंबले होते. सदर रंग बनविणारी कंपनी खोलगट आणि रस्त्याच्या लेवल खाली असल्यामुळे कंपनीत देखील गुडघाभर पाणी तुंबले होते. त्यामुळे या कंपनीतील रंग पाण्यात मिक्स होऊन ते पाणी कंपनीच्या मागे असलेल्या नाल्याला मिळत होते. सदर कंपनीत प्रिंटींग आणि लेदर प्रिंटींगसाठी वापरला जाणार रंग तयार होतो, असे संबंधित कंपनी अधिकाऱ्याने सांगितले. याचवेळी सदर ठिकाणी आलेल्या ‘एमआयडीसी'च्या अधिकाऱ्यांनी देखील चौकशी केली.
हिरवा पाऊस...
डोंबिवली मध्ये हिरवा पाऊस पडल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पाहणी केली होती. त्यावेळी देखील आम्ही त्या कंपनीचा शोध घेऊन सत्य समोर आणले होते. तो एक हिरवा फुड रंग होता आणि त्याची पावडर वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडली होती. नंतर पाऊस आल्यावर पाण्यामुळे सर्वत्र रस्ते हिरवे झाले होते. संबंधित कंपनीविरुध्द ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत कारवाई केली होती.