सिमेंट मिक्सर बंद पडला; ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक काेंडी
ठाणेः ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावरील गुरुद्वारा कटच्या पुढे कोपरी पुलाजवळ २३ एप्रिल रोजी सकाळी एक सिमेंट मिक्सर (बलगर) बंद पडला. यामुळे संपूर्ण वाहतूक एकाच मार्गीकेवरून वळवण्यात आल्याने ठाणे ते मुंबई या मुख्य वाहिनीवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घोडबंदरच्या मानपाड्यापर्यंत वाहनाच्या रांगा गेल्या होत्या. या कोंडीचा फटका सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांना बसला.
ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. सकाळ आणि सायंकाळी नोकरदार वर्गाची वाहने तर, दुपार आणि रात्री अवजड वाहने रस्त्यावर असतात. बंद पडलेला मिक्सर हटवण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू असले तरी हे काम पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याची माहिती मिळत आहे. परिणामी, कोपरी पूल ते कापूरबावडी आणि कापुरबावडी ते मानपाडा मार्गापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे दहा मिनिटाचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा कालावधी लागत होता. विशेषतः सकाळच्या ऑफिस वेळेत कामावर जाणारे नोकरदार, विद्यार्थी आणि प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले. अनेकांना कार्यालयात पोहचण्यास उशीर झाला. अनेक वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनीही याबाबत नागरिकांना सोशल मीडियावरून माहिती देत मुंबईकडे जाण्यासाठी तीन हात नाक्याहून मॉडेल चेक नाका मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे