अंजुरफाटा-काल्हेर रस्त्याची दुरावस्था

भिवंडी : अंजुर फाटा ते काल्हेर रस्त्याची सध्या प्रचंड दुरावस्था झाली असून या महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि मेट्रो प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे तसेच गटार व्यवस्थापन नसल्याने गटारातील पाणी रस्त्यावर साचून वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी ९ मे रोजी या महामार्गाची पाहणी केली.

या पाहणी दौऱ्यात रस्त्यावर काल्हेर, पूर्णा, हॉलीमेरी स्कुल अंजुर फाटा परिसरात रस्त्याच्या बाजुला गटार व्यवस्थापन नसल्याने आणि जुने नाल्यांचे प्रवाह बांधकाम व्यवसायिकांनी बंद केल्याने महामार्गावर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. गटाराचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी ‘सार्वजनिक बांधकाम विभाग'सह ‘एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिले. त्यानुसार महामार्गांवरील गटाराचे व्यवस्थापन आणि रस्त्याच्या दुरावस्था संदर्भात दखल घेऊन प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन ‘पीडब्ल्यूडी'च्या अधिकाऱ्यांनी खासदार म्हात्रे यांना दिले आहे.

दरम्यान, अंजुर फाटा-काल्हेर रस्त्याची दुरावस्था झाली असून या दुरावस्थेला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि मेट्रो प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. अधिकाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सदर रस्त्याच्या दुरावस्थेकडे आणि गटार व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष झाले तर भविष्यात पावसाळ्यातील ४ महिने रस्ता बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाहणी दौऱ्यात दर्शविलेल्या कामांची दखल घेतली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘रामबाग'वर ‘सिडको'ची वक्रदृष्टी