विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉर प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना न्याय द्या
भिवंडी : भिवंडी तालुक्यातून विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर प्रकल्प जात असून या प्रकल्पात भिवंडीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. मात्र, या प्रकल्पात बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारा मोबदला अत्यल्प असल्याने अनेक शेतकरी नाराज आहेत. बाधित शेतकऱ्यांनी ‘भिवंडी'चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिल्यानंतर खासदार म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, या संदर्भात आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.
विरार-अलिबाग मल्टी मोडल कॉरिडोर प्रकल्पातील बाधीत शेतकऱ्यांना मिळणार मोबदला अत्यल्प असून जमिनीच्या मोबदल्या बाबत नव्याने दरनिश्चीत करण्याकरिता नवीन दरनिश्चीत समितीची नेमणूक करावी तसेच त्यामध्ये शेतकरी आणि त्यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग घ्यावा. भिवंडी तालुक्यातील सर्व प्रकल्पबाधित जमिनीला सरसकट गुणांक २ लागू करण्यात यावा. सर्व प्रकल्पबाधित शेतक-यांना अथवा शेतक-यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त दाखले देवून भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाल्याच्या १ वर्षाच्या आत कायस्वरुपी शासकीय सेवेत सामील करुन घेण्यात यावे. सदर प्रकल्पाला होणाऱ्या वार्षिक नपयातून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना एक नफा हिस्सा निश्चीत करुन कायम स्वरुपी देण्यात यावा. सदर भूसंपादन संमतीची जी मुदत २१ दिवसाची दिली आहे, तिचा कालावधी वाढवण्यात यावा, अशा मागण्या खा. सुरेश म्हात्रे यांनी जिल्हाधिकारी शिनगारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आपल्या मागण्यांची दखल घेतली असून लवकरच या संदर्भातील निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन आपल्याला दिले आहे. शेतकऱ्यांचा हक्क माझा संघर्ष आहे आणि त्यांना न्याय देण्यासाठी मी त्यांच्या पाठिशी कायम उभा राहणार आहे, अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.