नेरुळ-बेलापूर-उरण मार्गावरील लोकल फेरीमध्ये १ तासाचे अंतर

नवी मुंबई : उरण-नेरुळ-बेलापूर मार्गावरील लोकल रेल्वे फेरी एक तासाने असल्याने उलवे ते उरण या मार्गावरील प्रवाशांना दरदिवशी प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उरण-नेरुळ-बेलापूर मार्गावरील लोकलच्या फेऱ्या वाढवून लोकल फेरी प्रत्येक १५ मिनिटाला करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. त्यासाठी उरण ,बामणडोंगरी, खारकोपर मधील नागरीक व्हॉट्‌सॲप ग्रुप माध्यमातून एकत्र येत आहेत. तसेच रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन उभारण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

कामगार, विद्यार्थी, महिलांची गैरसोय

 उरण-नेरुळ-बेलापूर मार्गावर कामासाठी जाणारे नोकरदार, शाळा-कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि विविध गरजांसाठी प्रवास करणाऱ्या महिलांना वेळेवर पोहोचणे कठीण झाले आहे. विशेषतः प्रत्येक लोकलमध्ये एक तासाचा फरक असल्यामुळे स्टेशनवर प्रतिक्षा करणे भाग पडते. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, काहींनी मुंबईमध्ये शिक्षण घेणेच बंद केले आहे.

रात्रीचा प्रवास अधिक धोकादायक

रात्री ९ नंतर लोकल नसल्याने कामावरुन उशिरा परतणाऱ्या प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी खासगी वाहने वापरणे अपरिहार्य ठरत आहे. यामुळे त्यांना अधिक खर्च आणि असुरक्षिततेला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सकाळी ४ः३० वाजता पहिली लोकल आणि रात्री १२ वाजेपर्यंत शेवटची लोकल चालविण्याची मागणी  उरण-नेरुळ-बेलापूर मार्गावरील प्रवासी संदीप मुताल यांनी केली आहे.

नेरुळ-जेएनपीटी-उरण मार्गावरील प्रवास जीवघेणा

लोकल वेळा अपुऱ्या असल्यामुळे अनेक प्रवासी नेरुळ-जेएनपीटी-उरण मार्गावरुन दुचाकी किंवा खासगी वाहनाने प्रवास करत आहेत. नेरुळ-उरण मार्ग अत्यंत धोकादायक असून, अनेक अपघातांचे साक्षीदार झाला आहे. त्यामुळे, आणखी किती जीव गेल्यानंतर रेल्वे प्रशासन जागे होणार?, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

लोकसंख्येचा वेगाने वाढता भार

‘सिडको'ने बामणडोंगरी, खारकोपर परिसरात नुकतीच ५ हजारांपेक्षा अधिक घरांची लॉटरी काढली केली आहे. त्यामुळे उलवे, बामणडोंगरी आणि खारकोपर भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. उलवे परिसरातील लोकसंख्या आता ५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सध्याची उरण-नेरुळ-बेलापूर रेल्वे लोकल सेवा अपुरी आहे, असे प्रवासी अजय हेगडकर यांनी स्पष्ट केले.

उरण-नेरुळ-बेलापूर लोकलची वेळ सकाळी ५ वाजल्यापासून किंवा रात्री साडेदहा नंतर नसल्यामुळे महिलांना कामावर वेळेत पोहोचता येत नाही आणि रात्री घरी देखील वेळेवर पोहोचता येत नाही. पर्याय म्हणून महागड्या रिक्षा किंवा बस मधून प्रवास करावा लागत आहे, असे प्रवासी मिनाक्षी हिवराये यांनी निदर्शनास आणे.

उरण ते सीएसएमटी-ठाणे थेट लोकल सेवा सुरु झाली, तर नागरिकांना वेळेवर आणि खर्चिक प्रवासापासून मोठा दिलासा मिळेल, असे प्रवासी सार्थक म्हात्रे यांनी सांगितले.

प्रवाशांची ठाम मागणी

उरण-नेरुळ-बेलापूर मार्गावरील लोकल दर १५ मिनिटांनी चालवावी, सकाळी ४ः३० वाजता पहिली आणि रात्री १२ वाजेपर्यंत शेवटची लोकल असावी, अशी एकमुखी मागणी नागरिकांनी केली आहे. याशिवाय उरण ते सीएसटी, उरण ते पनवेल, उरण ते ठाणे आणि उरण ते गोरेगाव या मार्गांवर सुद्धा थेट लोकल सेवा सुरु करावी, अशीही मागणी  उरण-नेरुळ-बेलापूर मार्गावरील रेल्वे प्रवाशी करीत आहेत.

शासनाने लक्ष देण्याची गरज

रस्त्यावरील इतर पर्याय धोकादायक असल्यामुळे तसेच लोकल प्रवास फायदेशीर आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्यामुळे तात्काळ उरण-नेरुळ किंवा सीबीडी-बेलापूर या मार्गावर लोकल फेऱ्या प्रत्येक पंधरा मिनिटाला करण्यात याव्यात, अशी मागणी उरण-नेरुळ-बेलापूर या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांकडून करण्यात येत आहे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन किंवा उद्रेक होण्याची शक्यता उरण भागातील नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.  

नेरुळ-बेलापूर-उरण मार्गावरील लोकलच्या फेऱ्या एक तासाच्या अंतरावर असल्यामुळे नोकरदार वर्ग, महिला, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबरोबरच लोकल फेऱ्या प्रत्येक पंधरा मिनिटाला करणे आवश्यक आहे.त्यानंतरच उरण भागात राहणाऱ्या सर्वसामान्य गोरगरीब नोकरदारांना या लोकल सेवेचा लाभ होईल. - डॉ. नितीन दिघे.

उलवे भागात राहणारे डॉ. नितीन दिघे यांनी उरण, बामणडोंगरी, खारकोपर येथील नागरिकाना व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आणण्यास पुढाकार घेतला आहे. नुकतेच त्यांनी खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन  उरण-नेरुळ-बेलापूर लोकलसेवेच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवकाळी पावसाच्या महापालिका प्रेसरुममध्ये बरसती धारा