नवी मुंबई महापालिका लोकाभिमुख करणार -खा. नरेश म्हस्के

नवी मुंबई : ठाणे महापालिकेत कोणताही नागरिक केव्हाही जाऊ शकतो, अधिकाऱ्यांशी बोलू शकतो. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना जाब देखील विचारु शकतो. त्याच धर्तीवर आपण नवी मुंबई महापालिका लोकाभिमुख करणार, असे स्पष्ट उद्‌गार खासदार नरेश म्हस्के यांनी सानपाडा येथे काढले. 

‘युवा सेना'चे नवी मुंबई उपाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने ‘सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ'च्या कार्यालयात ९ जून रोजी खा. नरेश मस्के यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी शासनाचे सेवानिवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, आरोग्य संवादक सौ. अलका भुजबळ, ‘सानपाडा ज्येष्ठ संघ'चे अध्यक्ष मारुती कदम, माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, महिला आघाडी संघटक सुरेखा गव्हाणे, आदि उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक आम्हाला आई-वडिलांसारखे आहेत. त्यांचे जे काही प्रश्न असतील, ते प्राधान्याने सोडवले जातील. एवढेच नव्हे तर गरज पडली तर खासदार निधीतून देखील त्यांना मदत केली जाईल, अशी ग्वाही देखील खासदार म्हस्के यांनी यावेळी दिली.

‘सानपाडा ज्येष्ठ संघ'चे अध्यक्ष मारुती कदम यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये ‘संघ'चे १३५० सभासद असून, या ‘संघ'तर्फे ज्येष्ठांना मार्गदर्शन, व्याख्याने, आरोग्य शिबिरे, नेत्र चिकित्सा शिबिर, पुरुष-महिला योगा, कॅरम, गायन, निबंध स्पर्धा, असे अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी नवी मुंबईत सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ सर्वात मोठा असून, या ‘संघ'ला वर्षभर उपक्रम राबविण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. तरी कार्यालयासमोर समोर जागा वाढून दिली तर बरे होईल, अशी विनंती केली.

तर एसटी महामंडळाच्या सर्व एसटी गाड्या सानपाडा येथे जाताना आणि येताना थांबल्या पाहिजेत, असे लेखी निवेदन आरोग्य संवादक सौ. अलका भुजबळ यांनी खासदार नरेश म्हस्के यांना दिले. देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेली आम्ही अधिकारी झालो आणि करिअरच्या नव्या दिशा अशी २ पुस्तके खासदार नरेश मस्के यांना भेट दिली.

युवा सेना उपाध्यक्ष अविनाश जाधव, महिला आघाडी संघटक सुरेखा गव्हाणे, आदिंनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सहसचिव शरद पाटील यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन संघाचे खजिनदार विष्णुदास मुखेकर यांनी तर आभार बळवंत पाटील मानले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

विकास आराखड्यातून मैदान रद्द करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेवर ग्रामस्थांची धडक