भात लागवडीच्या कामांना वेग
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीणमध्ये भात लागवडीच्या कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. तर यंदा मान्सूनची वाटचाल शेतीला पोषक अशीच सुरु आहे. परंतु, पावसाची वाटचाल बळीराजासाठी कितपत सुरळीत राहते ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
मागील २ वर्षांपासून अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना भात लावणीनंतरही अथक परिश्रमासह आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे समोर आले होते. मात्र, यंदा मे महिन्याच्या मध्यंतरी पासूनच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनला सुरुवात होऊन खंडाने भात शेतीला पोषक असा समाधानकारक पाऊस आतापर्यंत कोसळला आहे.असे असतानाही शेतकऱ्यांनी भात बियाणे पेरणीकरिता घाई न करता सावधपणे मे महिन्याच्या अखेरीस शेती मशागतीची कामे पूर्ण करून जून महिन्यात भात पेरणी केली. त्यानंतर जून महिन्यात मान्सूनने खंडाने वेळोवेळी हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जुलै महिन्याच्या प्रारंभी आठवड्यात भात पिकांची बहरलेली हिरवीगार रोपे शेतात लावण्याची (भात लावणी) कामे भिवंडी तालुक्यात जोमाने सुरु झाली आहेत. तर अशाच प्रकारच्या पावसाची अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. दरम्यान, आगामी काळात पावसाची स्थिती कशी असेल? याबाबत शेतकरी वर्गात साशंकता असली तरी सद्यस्थितीत भातशेतीला पोषकच पाऊस कोसळत आहे. त्यामुळे यंदा बळीराजा नुकसानी पासून मुक्त होणार असल्याचे स्पष्ट होत असून भिवंडी तालुक्यातील भात पिकाच्या १६८०० हेक्टर क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात भात पिकाची आस शेतकऱ्यांना लागली आहे.