कर्णकर्कश आवाज; ६९ सायलेन्सर जप्त
तुर्भे : कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर मोटारसायकलला लावून, वेगात वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाशी वाहतुक नियंत्रण शाखा मधील वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये कर्णकर्कश आवाजाचे ६९ वाहनांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. आवश्यक परवानगी घेवून लवकरच जप्त करण्यात आलेले सायलेन्सर नष्ट करण्यात येणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी दिली.
नवी मुंबई पोलीस उपायुवत (वाहतुक) तिरुपती काकडे यांच्या आदेशाने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वि्ील कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई मध्ये कर्णकर्कश सायलेन्सर संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी स्पष्ट केले.
कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून वेगात वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांविषयी जेष्ठ नागरिक आणि इतर नागरिकांनी वाहतुक नियंत्रण शाखेकडे तक्रार केली होती. या तक्रारींची नोंद घेत कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी दिवसा आणि रात्री विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांचे सायलेन्सर जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहन चालकांकडून ६९ हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला. या विशेष मोहीम मध्ये दोन महागडया कारचालकांनी त्यांच्या वाहनांमध्ये अनधिकृत बदल करुन कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावल्याचे आढळून आले. या कारचालकांवर मोटर परिवहन विभाग यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी सांगितले.