‘गुढीपाडवा-शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उत्तम प्रतिसाद
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्षण शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी महापालिका शाळांचा संपूर्णतः कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यानुसार शाळा दुरुस्ती आणि प्रामुख्याने शाळांची पटसंख्या वाढविणे या बाबींचा अंतर्भाव आहे.
शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी बालवाड्यांचे बळकटीकरण करणे आणि महापालिका शाळा सर्व सुविधायुक्त तसेच दर्जेदार करणे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘केडीएमसी'च्या विविध शाळांमध्ये तब्बल ४०३ मुलांनी शाळा प्रवेश घेतला.
महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील उंबर्डे तसेच डोंबिवली मधील पाथर्ली शाळेमध्ये आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांचे हस्ते शाळेत नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची पटनोंदणी उत्साहात करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक शाळाबाह्य मुलांच्या शाळा प्रवेशासाठी शिक्षण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळांसाठी मोठ्या प्रमाणात निधीही दिला असल्याची माहिती आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिली. यावेळी सजग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून शाळेने उभारलेल्या अत्याधुनिक अशा संगणक कक्षाचे आणि सुसज्ज प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी माजी महापालिका सदस्य जयवंत भोईर, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रातील इतर मान्यवर, शिक्षण विभागाच्या कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव, उपअभियंता गजानन पाटील, भाजपा पदाधिकारी शत्रुघ्न भोईर, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.