पाण्यासाठी मजीप्रा कार्यालयावर ठिय्या आंदोलन
अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिममधील बुवापाडा परिसरातील रहिवाशांनी २१ जुलै रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) कार्यालयात २ तास ठिय्या आंदोलन करत, अनियमित पाणी पुरवठ्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, येत्या १५ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ८ ऑगस्ट रोजी हंडा मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
‘लोकाधिकार सामाजिक संस्था'चे अध्यक्ष अशोक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली, बुवापाडा परिसरातील महिलांनी आंदोलन केले. पावसाळ्यात जलाशय भरलेले असतानाही, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झगडावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. मजीप्रा प्रशासनाने आपल्या लेखी उत्तरात, अनियमित वीजपुरवठा आणि पावसाळ्यातील फिल्टर चोकअप अशी पाणी समस्येची मुख्य कारणे असल्याचे सांगितले. लवकरच सुदर्शन चौकात नवीन बुस्टर पंप बसवण्यात येईल आणि अनधिकृत नळजोडण्या काढण्यात येतील, असे आश्वासन मजीप्राने दिले.
या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. परंतु, नागरिकांनी आपल्या मागणी पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक शाह आणि बबलू सिंह यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.