बिर्ला मंदिरात विठ्ठल भक्तांची मांदियाळी
उल्हासनगर : उल्हासनगर मधील प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या शहाडच्या बिर्ला मंदिरात आषाढी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेत विठ्ठल-रुक्मिणीची पुजा केली. यावेळी बिर्ला कॉलेजकडून काढण्यात आलेल्या ज्ञानदिंडीची त्यांनी प्रशंसा केली. मात्र कोणतेही राजकीय भाष्य त्यांनी यावेळी केले नाही.
आषाढी एकादशी निमित्त पहाटे उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते विठ्ठल-रुख्मिणीच्या महापुजा पार पडली. यावेळी सेंचुरी रेऑन कंपनीचे प्रमुख ओमप्रकाश चितलांगे, दिग्विजय पांडे आणि श्रीकांत गोरे देखील उपस्थित होते. त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे ५ वाजता अभिषेक, ६ वाजता आरती पार पडली. मंदिर परिसर टाळ-मृदंगाच्या गजरात न्हालेला दिसून आला.
कल्याण चॅरिटी ट्रस्ट, सेंच्युरी रेऑन, बी. के. बिर्ला महाविद्यालय, बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, बी. के. बिर्ला पब्लिक स्कुल आणि सेंच्युरी रेऑन हायस्कुल यांनी भव्य ‘ज्ञानदिंडी'चे आयोजन केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून ‘ज्ञानदिंडी'ला सुरुवात केली. यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करत टाळ मृदुंग ढोलकीच्या गजरात विठ्ठल नामात तल्लीन होत सहभाग घेतला होता. ज्ञानदिंडी कॉलेज पासून शहाडच्या विठ्ठल मंदिरापर्यंत ज्ञानोबा-तुकाराम विठ्ठल विठ्ठल जयघोष घुमत होता. दिंडी केवळ धार्मिक परंपरेची नव्हे तर शिस्त, संस्कार, सामुहिक सहभागाची जिवंत उदाहरण ठरली. शहाड येथील विठ्ठल मंदिरात ‘दिंडी'चा समारोप झाला.
बिर्ला मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेत आरती केली. त्यावेळी ‘उल्हासनगर'चे आमदार कुमार आयलानी, ‘अंबरनाथ'चे आमदार डॉ. बालाजी किणीकर, ‘सेंचुरी रेऑन कंपनी'चे ओमप्रकाश चितलंगे, श्रीकांत गोरे, ‘राष्ट्रवादी'चे प्रमोद हिंदुराव, शिवसेना उल्हासनगर महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, अरुण आशान, राजेंद्रसिंह भुल्लर, जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका आदि उपस्थित होते.
महाराष्ट्रातील बळीराजा शेतकरी सुखी होऊ दे, चांगला पाऊस होऊ दे, चांगले पीक येऊ दे आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, वारकरी, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दिवस येऊ दे, असे भगवान पांडुरंगाच्या चरणी मागणे मागितल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
बिर्ला मंदिरात दिवसभर ‘दिंडी'चे आगमन...
उल्हासनगर कॅम्प -४ मधील मध्यवर्ती शिवसेना शाखा संतोष नगरच्या वतीने ‘वारकरी दिंडी'चे आयोजन करण्यात आले होते. या ‘दिंडी'मध्ये ‘शिवसेना उबाठा'चे नेते धनंजय बोडारे, भगवान मोहिते, जया तेजी, वसुधा बोडारे, विजय सावंत आदि सहभागी झाले होते. त्याचबरोबर शहाड, आंबिवली, कल्याण आणि अंबरनाथ परिसरातून अनेक दिंड्या भगवी पताका विठ्ठल नामाचा गजर करीत बिर्ला मंदिरात आल्या. यावेळी हजारो वारकऱ्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्यासह शेकडो पोलिसांचा पोलीस बंदोबस्त तैनात होता.