सीबीआय, ईडी, सुप्रीम कोर्टाच्या नावाने सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
नवी मुंबई : इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचे भासवून, सीबीआय, ईडी, सुप्रीम कोर्टच्या बनावट लेटरहेड्सद्वारे प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तिच्याकडून तब्बल १ कोटी ८१ लाख रुपये उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने पर्दाफाश केला आहे. तसेच या टोळीतील तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल फोन्स, विविध बँकांचे चेकबुक्स, डेबिट कार्ड्स, सिमकार्ड्स, बोगस कंपन्यांचे शिक्के, बँक अकाउंट उघडल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत.
या प्रकरणात फसवणूक झालेल्या प्राध्यापिका नेरुळ मध्ये राहण्यास असून गत जानेवारी महिन्यामध्ये सायबर टोळीने त्यांना संपर्क साधला होता. तसेच इनकम टॅक्सचे अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या नावावर असलेल्या कंपनीचा ८.६२ लाख रुपयांचा कर बाकी असल्याचे व दिल्ली पोलिसांकडे त्याबाबत तक्रार दाखल असल्याचे त्यांना सांगितले होते. तसेच अमित चौधरी प्रकरणात व मनी लाँड्रिंगमध्ये त्यांचे नाव आल्याचे सांगून त्यांच्यावर दिल्ली पोलिसांकडून कारवाई होणार असल्याची भिती दाखवण्यात आली होती.
त्यानंतर सायबर टोळीने या महिलेला व्हॉट्सॲपद्वारे सीबीआय, इडी आणि सुप्रीम कोर्टाच्या बनावट लेटरहेड्स पाठवून, त्या माध्यमातून त्यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवली. त्यानंतर त्यांच्या सर्व संपत्तीची आरबीआयमार्फत तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ८१ लाख रुपये सहा वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतले होते. मात्र नंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर या महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाकडील तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास तुंगेनवार, सचिन कोकरे, सतिश भोसले, मंगेश वाट आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व बँक व्यवहारांचा मागोवा घेत आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर गुन्हे शाखेने अंधेरी येथे सुरू सायबर टोळीच्या कार्यालयावर छापा टाकून रमेश बाबुलाल शेट (पटवा) (४५), अमिश दीपक तुलसीदास शाह (४२) व राजकुमार गेलाराम नारंग(५५) या तिघांना अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांनी दिली.
हस्तगत करण्यात आलेला मालमत्ता
या कारवाईत पोलिसांनी ११.३५ लाखाची रोख रक्कम, १ लॅपटॉप, १८ मोबाईल फोन्स, १८ विविध बँकांचे चेकबुक्स, ३२ डेबिट कार्ड्स, २७ सिमकार्ड्स, १० बोगस कंपनीचे शिक्के , ३६ बँक अकाउंट उघडल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत.
आरोपींची फसवणुकीची कार्यपद्धती
या प्रकरणातील सायबर टोळी बोगस कंपन्या स्थापन करतात. त्यानंतर या कंपन्यांच्या नावाने बँकांमध्ये करंट अकाउंट उघडतात. तसेच इंटरनेट बँकिंगची सुविधा मिळवून त्याचे साहित्य, मोबाईल सिमकार्ड परदेशात बसलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना पाठवून देतात. त्यानंतर या टोळीतील इतर सदस्य व्हिडीओ कॉलद्वारे लोकांना धमकावून त्यांना डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. लोकांकडून उकळलेले पैसे याच खात्यात स्वीकारून ते पैसे वेगवेगळ्या खात्यात ट्रान्स्फर केले जात असल्याचे तपासात आढळून आले आहे.
आरोपींच्या विरोधात दाखल गुन्हे:
अमिश शाह याच्या विरोधात CBI, मुंबई आणि जुनागड पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. तसेच राजकुमार नारंग याच्यावर गुजरातमधील चार पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तर रमेश शेट (पटवा) याच्यावर मुंबईतील एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचप्रमाणे या टोळीने उघडलेल्या बँक खात्यांवर ७३ ऑनलाईन तक्रारी एन सी आर पी सी पोर्टलवर दाखल झाल्याचे उघडकीस आले आहे. या गुन्ह्याच्या तपासात अटक आरोपी व त्यांच्या इतर साथीदारानी गुन्हेगारी कट रचून संघटितरित्या सदरचा गुन्हा केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या टोळी विरोधात संघटित गुन्हेगारी टोळी नुसार (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांना आवाहन
नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्याबाबत असलेल्या अज्ञानाचा सायबर गुन्हेगाराकडून फायदा उचलण्यात येत आहे. कायद्यात डिजिटल अरेस्टची संकल्पना नाही. त्यामुळे कोणताही शासकीय अधिकारी फोनवरून तुमच्यावर कारवाई करत असल्याचे सांगत असेल, डिजिटल अरेस्टचा उल्लेख करत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा. कुठल्याही खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यापूर्वी खात्री करा. असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त अजय कुमार लांडगे यांनी केले आहे.