नवी मुंबई शहरात धारावी गॅस सिलेंडर स्फोटाची पुनरावृत्ती होण्याची भीती?
वाशी : २४ मार्च रोजी रात्री मुंबई शहरातील धारावी मध्ये गॅसने भरलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याने मोठी वित्तहानी झाल्याची घटना घडली. नवी मुंबई शहरात देखील आज नागरी वस्ती तसेच रहदारीच्या रस्त्यात राजरोसपणे वाहने उभी करुन गाडी मधूनच गॅस सिलेंडरची हाताळणी केली जाते.त्यामुळे नवी मुंबई शहरात देखील भविष्यात धारावी सारखी आगीची पुनरावृत्ती होण्याची शवयता असल्याने रस्त्यावर गॅस सिलेंडरची हाताळणी करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.
वाशी-कोपरखैरणे मार्गावर जुहूगाव येथे गावदेवी मरीआई मंदिर समोर घरगुती एचपी गॅस सिलेंडर पुरवणारी एजन्सी आहे. या ठिकाणी गॅस सिलेंडर घेऊन रोज मोठी वाहने येत असतात. या मोठ्या वाहनांमधून नवी मुंबई शहरातील विविध भागात गॅस सिलेंडर पुरवठा करण्यासाठी छोट्या वाहनात गॅस सिलेंडर भरले जातात. या ठिकाणी रोज ८ ते १० वाहने उभी असतात. याशिवाय गॅस सिलेंडर हाताळणी रस्त्यावरच केली जाते. तसेच या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे एखादे वाहन गॅस सिलेंडर वाहनाला धडकण्याची शक्यता निर्माण होत आहे. गॅस सिलेंडर हाताळणी रस्त्यावरच होत असल्याने एखाद्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गावदेवी मरीआई मंदिराच्या पलिकडे पेट्रोलपंप देखील आहे. या पेट्रोल पंपावर सीएनजी गॅस देखील भरला जातो. याठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने गॅस सिलेंडरमुळे जर एखादा स्फोट झाला तर होणारी हानी टाळता येण्यासाठी गॅस सिलेंडर वाहतूक करणारी वाहने नागरी वस्तीपासून दूर ठेवावीत, अशी मागणी जुहूगावातील नागरिक करीत आहेत.