नवी मुंबईत ४ नवीन सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती; २ अधिकाऱ्यांची बदली
नवी मुंबई : राज्याच्या गृहविभागाने गुरुवारी राज्यातील 65 पोलीस उप अधिक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. यात नवी मुंबई पोलीस आयक्तालयात 4 नव्या सहाय्यक पोलीस आयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे. तर नवी मुंबईतील दोन सहाय्यक आयुक्तांची इतत्र बदली करण्यात आली आहे. नवी मुंबईत दाखल झालेल्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या लवकरच अंतर्गत बदल्या करण्यात येणार असल्याचे सुतोवाच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नुकतीच एका परिमंडळाची भर पडल्याने एक पोलीस उप आयुक्त (बेलापूर परिमंडळ-2) व दोन सहाय्यक पोलीस आयुक्तांची (रबाळे विभाग व खारघर विभाग) नवीन पदे निर्माण झाली आहेत. या नव्या दोन विभागांचा विचार करुन गृह विभागाने नवी मुंबईत 4 सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती केली आहे. यात खालापूर येथील उप विभागीय पोलिस अधिकारी विक्रम रमाकांत कदम, फलटण उपविभाग सातारा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी राहूल रावसाहेब धस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील अपर पोलिस अधीक्षक विजय नथू चौधरी व मुंबई शहर येथील सहायक पोलिस आयुक्त योगेश अशोकराव गावडे या चार अधिकाऱयांचा समावेश आहे. या अधिकाऱयांच्या लवकरच अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत.
दरम्यान, नवी मुंबईतून पोर्ट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल वसंत नेहूल यांची रायगड मधील खालापूर उपविभागात उप विभागीय पोलिस अधिकारी म्हणुन बदली करण्यात आली आहे. तर महापे येथील डायल 112 कार्यालयातील सहायक पोलिस आयुक्त प्रदिप गिरीजनाथ तिदार यांची मुंबईतील महाराष्ट्र सायबर कार्यालयात पोलिस उप अधिक्षक म्हणुन बदली करण्यात आली आहे.