सिडको सोडतधारक पोहोचले उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या गावी
नवी मुंबई : सिडको महागृहनिर्माण प्रकल्पातील २६ हजार घरांच्या किंमती कमी झाल्या पाहिजे या मागणीसाठी मागील दीड महिन्यांपासून सिडको सोडत धारकांचा लढा सुरु आहे. विविध मंत्री, आमदार, खासदार, सिडको अधिकारी यांना भेटून निवेदने दिली. ‘मनसेे'चे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहरअध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली विविध आक्रमक आंदोलने केली. पण, राज्य सरकार आणि सिडको प्रशासन घरांचे दर कमी करत नाही. तसेच पुष्टीकरण रक्कम भरण्याची मुदत संपत आली आहे. यामुळे व्यथित झालेल्या सिडको सोडत धारकांच्या ३२ जणांच्या कोर कमिटीने सातारा येथील दरे गावी जावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना पूर्ण विषय समजावून सांगण्यात आला. तसेच घरांच्या किंमती कमी करण्यासाठी साकडे घालण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी सिडको सोडतधारकांच्या घरांच्या वाढीव दरासह इतर मुद्दे ऐकून घेतले. त्यावर ना. एकनाथ शिंदे यांनी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना फोन करुन पुढील प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले. तसेच घरांचे दर कसे कमी करण्यात येतील, यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यासोबतच सिडको सोडतधारक सुमित साठे, प्रज्ञा रावळ, महेश शेगर आणि इतर सिडको विजेत्यांना व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी भेट द्यावी, अशी सूचना केली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे सिडको घरांच्या किंमती कमी होतील अशा आशा सर्व सोडत धारकांमध्ये पल्लवित झाल्या आहेत.