‘आरोग्य दिन'निमित्त डॉक्टर्स, आरोग्यकर्मींचा सन्मान

नवी मुंबई : ‘जागतिक आरोग्य दिन'ची या वर्षीची संकल्पना निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य अशी असून त्यास अनुसरुन निरोगी सुरुवातीच्या दृष्टीने शून्य ते ४ वयोगटातील बालकांच्या आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे. बालमृत्यू आणि गरोदर माता मृत्यू यांचे प्रमाण शून्य करण्यासाठी गरोदर मातांचे आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कुटुंबियांचे प्रबोधन करावे, अशी सूचना नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली.

नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजित विशेष समारंभात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी उपस्थित डॉक्टर्स, नर्सेस आणि वैद्यकिय कर्मचारी यांना आरोग्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. आरोग्य विभागामार्फत चांगले काम सुरु असल्याचे सांगत अधिक उत्तम काम करुन नागरिकांना समाधानकारक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी काम करुया, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी महापालिका वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. अजय गडदे तसेच महापालिकेच्या तिन्ही रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक आणि पदव्युत्तर पदवी वैद्यकिय शिक्षण संस्थेचे प्रमुख व्यासपिठावर उपस्थित होते.

भारतातील बालके आणि गरोदर माता मृत्यू प्रमाण आणि लसीकरण याची आकडेवारी सांगत नवी मुंबईमधील स्थिती या बाबत सर्वोत्तम राहिल, असे लक्ष्य ठेवून काम करावे. या दृष्टीने नागरिकांशी दैनंदिन थेट संबंध येणाऱ्या आशा सेविका तसेच एएनएम यांची जबाबदारी मोठी असून त्यांच्यामार्फत प्रबोधन व्हावे आणि निरीक्षण ठेवण्यात यावे, असेही आयुवत शिंदे यांनी सूचित केले.

प्रांरभी वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांनी मागील वर्षाभरात आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य सेवेत करण्यात आलेल्या विविध सुविधा कामांचा आणि सुधारणांचा सविस्तर आढावा घेतला.  

दरम्यान, ‘जागतिक आरोग्य दिन'चे औचित्य साधून ऐरोली रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. रविंद्र म्हात्रे आणि वाशी रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक राजेश म्हात्रे यांना त्यांच्या सहकाऱ्यांसह सर्वोत्तम रुग्णालय म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वोत्तम प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांचा सन्मान नेरुळ फेज-१, सीबीडी-बेलापूर आणि नोसील नाका या केंद्रांना प्रदान करण्यात आला. ४७७ आशा सेविकांमधून प्रतिक्षा पांचाळ,  सुशिला कोकणे, अनिशा शेख यांना सर्वोत्तम आशा सेविका म्हणून प्रशस्तीपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले.

महापालिकेच्या बालवाडी, अंगणवाडीतील शून्य ते ३ वर्षाच्या बालकांची तपासणी होत असते. या व्यतिरिक्त खाजगी अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांचीही आरोग्य तपासणी करण्याकडे विशेष लक्ष द्यावे. आधुनिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरातील बालके कुपोषित राहू नयेत यादृष्टीने महापालिका रुग्णालयात न्युट्रीशन रिहॅबिलेटेशन सेंटर सुरु करावे. तसेच एनआरसी युनिट तातडीने कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक उल्लेखनीय कामे करण्यात येतात. त्या कामांची व्यवस्थित नोंद करुन डॉक्युमेंटेशन करावे. जेणेकरुन इतरांना ते मार्गदर्शक ठरेल.
डॉ. कैलास शिंदे, आयुक्त-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ज्येष्ठ साहित्यिक साहेबराव ठाणगे यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त नामांकितांचे कविसंमेलन