इंस्टाग्रामवर अंमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल करणारे चौघे तरुण अटकेत  

नवी मुंबई : अंमली पदार्थांचे सेवन करत इंस्टाग्रामवर त्याबाबतचा व्हिडीओ व्हायरल करणाऱया चार तरुणांना नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने या चौघांकडुन 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 18 ग्रॅम हेरॉईन देखील जफ्त केले आहे.  

या कारवाईत अटक करण्यात आलेल्यामध्ये संतोष दिनेश कांबळे (22), सलमान सलिम दौला (29), सनी दिनेश कांबळे (24) व 17 वर्षीय त्यांचा साथीदार या चौघांचा समावेश आहे. हे चारही तरुण बेलापूर गावात राहण्यास असून त्यांनी गत 5 मार्च रोजी अंमली पदार्थांचे सेवन करत इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. सदरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांनी अंमली पदार्थ विरोधी कक्षाला सदर आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व त्यांच्या पथकाने सदर आरोपींचा शोध घेतला असता, ते बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती त्यांना मिळाली.  

तसेच सदर आरोपी हे बेलापूर येथील पंचशिल नगरमध्ये अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची देखील माहिती पोलिसांना मिळाली. सदर माहितीच्या आधारे अमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवार दि. 6 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता सापळा रचून बेलापूर मधील पंचशील नगरमधुन चारही तरुणांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांच्याजवळ सापडलेले 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 18 ग्रॅम हेरॉईन जफ्त केले. या चौघांनी इंस्टाग्रामवर अंमली पदार्थांचे सेवन करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याचे त्यांच्या चौकशीत आढळुन आले. त्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने या चारही तरुणांविरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींची 11 पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

दरम्यान, नवी मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थांचा प्रसार आणि व्यापार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येत आहे. अशा अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असून, यापुढेही अशा गुह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवी मुंबई पोलिसंकडुन देण्यात आला आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

एपीएमसी पोलिसांकडून २ परदेशी नागरिकांची धरपकड