नालेसफाईचे कोट्यवधी गेले वाहून

ठाणे : ठाणे महापालिका मध्ये गेल्या काही वर्षात नालेसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची लूट सुरु आहे. दरवर्षी  पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची लगबग सुरु असते. नालेसफाई योग्य झाली असल्याचे दावे महापालिकेच्या वतीने करण्यात येतात. परंतु, पाऊस येतो आणि शहरात ठिकठिकाणी पाणी जमा होते. यंदाही गेल्या चार दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नालेसफाईची पुन्हा एकदा पोलखोल झाली. बहुतांशी नाल्यात कचरा जैसे थे असल्याने नाले तुडुंब भरुन पाणी रस्त्यावर आले, तर बऱ्याच ठिकाणी घराघरात पाणी शिरले. सलग तीन दिवस शहरातील मुख्य रस्ते होते पाण्याखाली होते . १६ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या पावसाचे रुद्र रुप १९ ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत कायम होते. या काळात शहरात पाणीच पाणी झाले होते.  

दरम्यान, काम वाटप करताना हितसबंध जपणाऱ्या कंत्राटदारालाच कामाचे वाटप होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. दरवर्षी पावसाळापूर्व कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असले तरी नाल्यांची सफाई कधीच पूर्ण केली जात नाही. वरवरची सफाई केली जाते आणि नालेसफाई झाली असल्याचे दाखवून बीले पास केली जातात. विशेष म्हणजे  नालेसफाई किती झाली ते मोजण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नसल्यामुळे याचा फायदा आधिकारी आणि ठेकेदार घेताना दिसत आहेत. अशा प्रकारे संगनमताने महापालिकेच्या तिजोरीची लूट सुरु असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.

१६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट दरम्यान पावसामुळे आंबेडकर रोड, कोरमचा नाला, संभाजीनगर या परिसरातील नाले तुडुंब भरुन वाहत होते, तर त्यावेळी नाल्यात सर्वत्र कचऱ्याचे ढिगच ढीग दिसत होते. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रमुख रस्त्यावर पाणीच पाणी जमा झाले होते. बहुतांशी गटारे भरुन वाहत असल्याने ते पाणीही रस्त्यावर आले होते. शहरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली गेल्याने पहिल्याच पावसात शहराची अवस्था भयावह झाल्याचे दिसत होते. वंदना सिनेमा परिसर, वागळे, वर्तकनगर, मुब्रा, कळवा या परिसरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

नालेसफाईचा खर्च दशकात ५ पटीने वाढला...  
ठाणे महापालिकेत गेल्या काही वर्षात नालेसफाईच्या खर्चात मोठी वाढ होते आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात नाल्यांचे काँक्रीटीकरण झालेले असताना नालेसफाईचा खर्च कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे . २०१२-१३ साली नालेसफाईवर जो ३ कोटी ४१ लाख रूपये खर्च केला जात होता, तो गेल्या वर्षी तब्बल १५ कोटी रुपयांच्या घरात गेला होता. तर यंदा १० कोटी तरतूद करण्यात आली आहे.

नालेसफाईची उच्चस्तरीय चौकशीची मागणी...

ठाणे मधील नालेसफाईच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करा, अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहता तेच तेच तेच ठेकेदार सिंडिकेट करुन कामे घेतात. ठेकेदारांच्या कंपन्यांमध्ये मूळ प्रवर्तक कोण, भागिदार कोण, कुणाचे कुणाचे नातेवाईक आहेत, याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. नालेसफाईच्या अंदाजित खर्चातही मोठा गोलमाल असतो. गेल्या ४ वर्षात बहुतांशी निविदा ३० ते ३५ टक्के कमी दराने आल्या आहेत. त्यामुळे एवढ्या कमी दरात काम करणे कसे परवडते? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
वर्ष खर्च तरतूद (रुपये)
२०१२-१३                ३,४१,७९,६८५                      
२०१३-१४                ४,३९,९१,०००                    
२०१४-१५                ४,५२,००,०००
२०१५-१६               ५ ,९२ ,५६०००
२०१६-१७               ६,५२,३३,०००
२०१७-१८               ७,०८,३५,०००
२०१८-१९                ११,४४,००,०००
२०२० -२१               ६,३७,००,०००
२०२१-२२                १४,८५,००,०००
२०२२-२३                १२,००,००,०००
२०२३-२४                १५,००,००,०० ०
२०२५-२५                १०,००,००,००० 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलिसांकडून विघ्नहर्ता पुरस्कारचे वितरण