४० वर्षांचे मच्छी मार्केट बंद
अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व येथील ४० वर्षे जुन्या मच्छी मार्केटवर अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने २७ ऑवटोबर रोजी कारवाई केली. या जुन्या मार्केटच्या जागेला लोखंडी जाळी लावून बंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अनेक दशकांपासून येथे आपला व्यवसाय चालवणाऱ्या आणि उपजीविका करणाऱ्या मच्छी विक्रेत्यांचा रोजगार हिरावला गेला आहे.
नगरपालिकेच्या या कारवाईमागे परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधी असे मुख्य कारण असल्याचे नगरपालिकेचे म्हणणे आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी नरेंद्र संखे यांनी सांगितले की, मासे विक्रेते परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरवत असल्याने दुर्गंधी येत होती. यासंदर्भात स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच पोलिसांनीही विक्रेत्यांविरोधात कारवाई केली आहे. यामुळे कायदेशीररित्या सदर कारवाई करण्यात आली आहे.
दुसरीकडे मच्छी विक्रेत्यांनी सदरची कारवाई अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या अनेक विक्रेत्यांचा यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर कारवाई बिल्डर व्यावसायिक आणि नगरपालिका अधिकाऱ्यांच्या कथित संगनमताने करण्यात आली आहे, असा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. परिसरात नुकत्याच बांधलेल्या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना मच्छीचा वास येतो, यासारख्या किरकोळ कारणांचा आधार घेऊन गरीब विक्रेत्यांचा रोजगार हिरावण्याचा सदर प्रयत्न असल्याचा त्यांचा दावा आहे. मच्छी विक्रेत्या सुनंदा कोळी यांनी नगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी महिलांना धक्काबुक्की केल्याचाही आरोप केला; मात्र नगरपालिकेचे अधिकारी संखे यांनी सदर आरोप फेटाळला.
‘हॉकरझोन संघटना'चे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी या कारवाईवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. राजकीय टपऱ्यांना अभय देऊन गोरगरिबांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे. मच्छी विक्रेत्यांना त्वरित पक्के गाळे देऊन त्यांचे पुनर्वसन करावे किंवा त्यांच्या व्यवसायासाठी हक्काची जागा आणि हॉकर झोन उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.
दरम्यान, विक्रेत्यांनी प्रशासनाकडे पुनर्वसन किंवा हॉकर्स झोनची मागणी केली असून, सदर कारवाईमुळे अंबरनाथमधील अनेक कुटुंबांसमोर उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.