‘स्मार्ट मीटर'साठी सक्ती केल्यास आंदोलन  

उल्हासनगर : ‘महावितरण'ने संपूर्ण राज्यात स्मार्ट प्रीपेड मीटर्स बसवण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी कोणत्याही ग्राहकांची परवानगी न घेता सक्तीने मीटर्स बसवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ग्राहकांनी या सक्तीच्या धोरणाला कडाडून विरोध दर्शविला आहे. ‘महावितरण'ने सदर मीटर्स ग्राहकांना मोफत  देण्याची जाहिरात केली असली, तरी प्रत्यक्षात त्याचा खर्च ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाणार असल्याचा आरोप उल्हासनगर मधील ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'चे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी केला आहे. स्मार्ट मीटर लावून घेण्यासाठी ग्राहकांना सक्ती केल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही बोडारे यांनी ‘महावितरण'ला निवेदनाद्वारे दिला आहे.  

उल्हासनग मधील ठाकरे गट आणि काही वीज ग्राहकांनी उल्हासनगर डिव्हीजन मधील कार्यकारी अभियंत्यांकडे या विषयावर शेकडो पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवेदन सदर केले. यावेळी उल्हासनगर डिव्हीजन-१ चे कार्यकारी अभियंता सतीश कुलकर्णी आणि डिव्हीजन-२ चे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले उपस्थित होते. आम्हाला स्मार्ट, प्रीपेड मीटर्स नकोत आणि आम्ही आमचे पोस्टपेड मीटर तसेच ठेवण्यास इच्छुक आहोत. ‘महावितरण'चा निर्णय सरकारच्या खाजगीकरणाच्या पुढील टप्प्याचा भाग असून यामुळे भविष्यात वीज दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेला विरोध केला जात असल्याचे धनंजय बोडारे यांनी ‘महावितरण'ला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे

‘महावितरण'ने मंजूर केलेल्या निविदांनुसार प्रत्येक स्मार्ट प्रीपेड मीटरचा खर्च सुमारे १२,००० रुपये इतका आहे. यासाठी केंद्र सरकारकडून फक्त ९०० रुपये अनुदान दिले जात असून उर्वरित ११,१०० रुपयांचा खर्च ग्राहकांच्या खिशातून वसूल केला जाणार आहे आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिली.

वीज कायदा-२००३ मधील कलम ४७ (५) नुसार कोणता मीटर वापरायचा याचा संपूर्ण निर्णय ग्राहकाचा हक्क आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर्स सक्तीने बसवण्याचा कोणताही निर्णय बेकायदेशीर असल्याचे ‘शिवसेना-उबाठा'च्या पदाधिकाऱ्यांनी ‘महावितरण' अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, ‘महावितरण'ने कोणतीही पूर्वसूचना न देता सदर निर्णय घेतला असून, त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा रोष आहे. या निर्णयाविरोधात ग्राहक आक्रमक होत असून, सक्तीने स्मार्ट मीटर बसवले गेले तर प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा ‘शिवसेना'तर्फे ‘महावितरण'ला  देण्यात आला आहे.

‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या वतीने जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ‘स्मार्ट मीटर'च्या विरोधात निवेदन दिले असून आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत आम्ही कळवले आहे. ते याबाबत योग्य तो निर्णय घेतील.
- प्रवीण चकोले, कार्यकारी अभियंता-महावितरण. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरूळच्या विक्रम सिंह अधिकारी यांची निवड