‘मोदी सरकार'ची ११ वर्षे पूर्ण

नवी मुंबई : सन २०१४, २०१९, नंतर २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाले आणि नरेंद्र मोदी यांनी ९ जून २०२४ रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. अर्थात जून महिन्यात मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई जिल्हा आणि ‘बेलापूर'च्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून विकसित भारताचा अमृतकाळ सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ११ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सीबीडी येथील वारकरी भवन येथे ‘विकसित भारत संकल्प सभा'चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या ‘विकसित भारत संकल्प सभा'मध्ये दीपप्रज्वलन ‘भाजपा'चे ज्येष्ठ नेते तथा ‘श्री अमरनाथजी श्राईन बोर्ड'चे सदस्य सुरेश हावरे आणि त्यांच्या पत्नी ‘विश्व मांगल्य ट्रस्ट'च्या उपाध्यक्षा नलिनी हावरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

श्रीनगरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ‘श्री अमरनाथजी श्राईन बोर्ड (एसएएसबी)'ची पुनर्रचना करुन विविध क्षेत्रातील ९ प्रतिष्ठित व्यक्तींना ३ वर्षांसाठी सदस्य म्हणून नामांकित केले आहे. त्यामध्ये सुरेश हावरे साहेब यांची सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे. याबद्दल सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश हावरे आणि नलिनी हावरे यांंचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विविध योजना अंतर्गत लाभार्थी तसेच वकील, डॉक्टर, इंजिनीअर, विविध पदांवर असलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार सुरेश हावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.   

‘मोदी सरकार'च्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याच्या हेतू आहे. गेल्या ११ वर्षात ‘मोदी सरकार'ने देशाच्या सीमा मजबूत केल्या, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचविले. महत्वाचे म्हणजे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर' राबवून भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे तसेच पाकिस्तानचे हवाईतळ उध्वस्त केले. हिंसाचाराला, दहशतवादाला घरात घुसून उत्तर दिले जाईल, हेच ‘मोदी सरकार'ने दाखवून दिले, असे आ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी मनोगतातून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या ११ वर्षाच्या कार्यकाळात विविध योजना राबविल्याने करोडो लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेतला. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागरिकांना विविध योजनांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे, असे आमदार म्हात्रे म्हणाल्या

सदर कार्यक्रमाप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर अनिल कौशिक, माजी नगरसेवक तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक पवार, काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका अनिता शेट्टी, भाजपा ज्येष्ठ नेते नाथा सरगर, गोपाळराव गायकवाड, ‘पंजाब कल्चरल वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष कमळ शर्मा, ‘हरियाणा वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष बलबीरसिंग चौधरी, भारतीय सहकार संस्था अध्यक्ष प्रमोद जोशी, वाशी भाजपा मंडळ अध्यक्ष विकास सोरटे तसेच भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई जिल्ह्याचे असंख्य कार्यकर्ते-पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘शहर जिल्हा काँग्रेस कमिटी'ची प्रांताध्यक्ष सपकाळ यांच्याकडे बैठक