ठाणे-बेलापूर मार्गावर पंढरपूरला जाणारी खाजगी बस पलटी, 4 प्रवासी जखमी  

नवी मुंबई : कल्याण येथून पंढरपूर येथे निघालेली खाजगी ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदरची बस रस्ता दुभाजकाला धडकून रस्त्यावर पलटी झाल्याची घटना मंगळवारी रात्री ठाणे-बेलापूर मार्गावर कोपरखैरणे येथे घडली. या अपघातात बसमधील चार प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बसचा चालकाने जखमी प्रवाशांना कोणत्याही प्रकारची मदत न करता पळून गेला असून तुर्भे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

या घटनेतील अपघातग्रस्त बालाजी ट्रव्हेल्सची बस मंगळवारी रात्री कल्याण येथून पंढरपुर येथे निघाली होती. या बसमध्ये 30 प्रवासी होते, सदर बस नवी मुंबईमार्गे पंढरपुरच्या दिशेने जात असताना, रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सदरची बस ठाणे बेलापूर मार्गावर कोपरखैरणे येथे आली होती. यावेळी भरधाव वेगात जात असलेल्या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची बस रस्ता दुभाजकाला जोरदार धडकली. त्यानंतर सदर बस रस्ता दुभाजक तोडून डाव्या बाजुस पलटी झाली. या अपघातानंतर बस चालक संभाजी माने याने बसमधील जखमी प्रवाशांना कोणत्याही प्रकारची मदत न करता, त्याठिकाणावरुन पलायन केले.  

या अपघाताची माहिती मिळताच तुर्भे पोलिसांनी व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर त्यातील जखमी झालेल्या स्मिता चौधरी (35), वैजयंता साबळे (62), सुजाता कांबळे (40), रघुनात सोनवले (57) या चार प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवून दिले. या बसच्या चालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे व बेदरकारपणे बस चालवून नेल्यामुळे सदरचा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार तुर्भे पोलिसांनी या अपघाताला जबाबदार धरुन बस चालक संभाजी माने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गव्हाण फाटा रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम २ वर्षापासून रखडले