टिटवाळा मांडा आरोग्य केंद्राची दुरवस्था

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील टिटवाळा पश्चिमेकडील मांडा परिसरातील आरोग्य केंद्राची सध्या दुरवस्था झाली असून येथे येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ‘जिल्हा परिषद'कडून हस्तांतरीत न झालेली सदर इमारत आजही जुनाट अवस्थेत आहे. याकडे महापालिको प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

मांडा परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्यानुसार आरोग्य सुविधांचा अभाव जाणवतो. किरकोळ आजारांसाठी देखील नागरिकांना खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः गरोदर माता, बालकांचे लसीकरण यासारख्या प्राथमिक आरोग्य सेवाही अपुऱ्या आणि असमाधानकारक असल्याने गरीब कुटुंबांचे हाल होत आहेत. कुत्रा चावल्यानंतर देण्यात येणारी ॲन्टी-रेबीज लस देखील येथे उपलब्ध नसल्याने त्यासाठी नागरिकांना कल्याण मधील रुक्मिणी रुग्णालय गाठावे लागते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या इमारतीत सध्या आरोग्य केंद्र सुरु आहे, ती मुळतः ‘जिल्हा परिषद'च्या अखत्यारित होती. महापालिका अस्तित्वात आल्यावरही ती जागा महापालिकेकडे हस्तांतरीत झालेली नाही. त्यामुळे जागेच्या दुरुस्तीसंबंधी कोणतेही निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. २०१०-२०१५ दरम्यान तत्कालीन उपमहापौर बुधाराम सरनोबत यांनी या जागेसाठी ३५ लाखांचा निधी मंजूर करुन घेतला होता. मात्र, जागेच्या मालकीचा वाद कायम राहिल्याने सदर निधी दुसरीकडे वळवण्यात आला.

सध्या आरोग्य केंद्रात १ पुरुष आणि १ महिला डॉक्टर, ४ नर्स, १ लॅब असिस्टंट, १ फाम्राासिस्ट, १ अटेंडन्ट आणि १६ आशा सेविका कार्यरत आहेत. दररोज ७०-८० रुग्णांची तपासणी येथे केली जाते. मात्र, अपुरी जागा, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांची कमतरता तसेच इमारतीतील गळती, घाणेरड्या आणी नादुरुस्त शौचालयांमुळे येणाऱ्या रुग्णांप्रमाणेच कर्मचारी वर्गाचीही कुचंबणा होते आहे. इमारतीच्या छताला गळती असून त्यावर टाकलेले प्लास्टिकही अर्धवट अवस्थेत आहे. संरक्षक भिंतीला भगदाड पडल्यामुळे मोकाट जनावरांचा वावर सुरु असतो. त्यामुळे आरोग्याच्या धोक्यांमध्ये भर पडते.

महापालिकेने अद्ययावत रुग्णालयासाठी जागा आरक्षित केली आहे. मात्र, याबाबतचा प्रस्ताव वर्षानुवर्षे धुळखात पडून आहे. परिसरातील वाढते नागरीकरण, सांडपाण्याचा निचरा, स्वच्छतेचा अभाव आणि त्यामुळे उद्‌भवणारे साथीचे आजार या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचा प्रश्न अधिक गंभीर ठरतो.

या संदर्भात ‘केडीएमसी'च्या आरोग्य अधिकारी दिपा शुक्ला यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मांडा आरोग्य केंद्रातील अडचणी मान्य केल्या. तसेच त्यांनी स्वतः पाहणी करुन संबंधित विभागाला सुधारणा करण्याबाबत सूचना दिल्याचे सांगितले. लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईत ड्रग्ज माफियांविरुध्द धडक कारवाई