‘दिबां'चे नाव विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
ठाणे : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समिती'ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्याबाबत राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असूनही, ‘दिबां'च्या नावाची घोषणा न झाल्यामुळे भूमीपुत्र जनतेत अस्वस्थता होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, ‘दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील, अतुल पाटील, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नाव देण्याची मागणी सर्वप्रथम २०१६ मध्ये कपिल पाटील यांनी खासदार असताना केली होती. त्यानंतर आगरी-कोळी समाज संघटीत झाला. ‘दिबां'च्या नावासाठी मोठे जनआंदोलन उभे राहिले. त्यात आगरी-कोळी बांधवांबरोबरच अन्य समाजबांधवही उभे राहिले होते. त्यानंतर भमीपुत्रांच्या रेट्यामुळे राज्य सरकारने विधीमंडळात ठराव मंजूर करुन दि. बा. पाटील यांच्या नावाला मान्यता दिली. त्यानंतर सदरचा ठराव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. परंतु, विमानतळाच्या नावाबाबत घोषणा होत नसल्यामुळे भूमीपुत्रांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर ‘नामकरण समिती'च्या पदाधिकाऱ्यांनी १९ जून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.