पाणी प्रश्नावर स्वप्नपूर्ती रहिवाशांचे आंदोलन! हाती पुन्हा पोकळ आश्वासन  

खारघर:  स्वप्नपूर्ती सोसायटीतील जवळपास 3५00 कुटुंबियांना मागील अनेक महिन्यांपासून पाण्याच्या प्रश्न भेडसावत असताना अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनाचा लेप लावला जात असल्यामुळे 1७ रोजी पाण्याच्या प्रश्नावर सिडकोच्या बेलापूर येथील रायगड भवन कार्यालयावर स्वप्नपूर्तीच्या रहिवाशांनी हंडाकळशी मोर्चा नेला होता. यात मोठ्या संख्येने महिलाही उपस्थित होत्या. सिडकोकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळेल अशी अपेक्षा असताना, पोकळ आश्वासन दिल्यामुळे रहिवासीयांनी नाराजी व्यक्त केली.

खारघर सेक्टर 3६ मधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृह संकुलातील ८,4 आणि ५ सोसायटी यांच्या संयुक्त विद्यामाने  आंदोलन आयोजित करण्यात आले होते.यावेळी महिला हाती हंडा, कळशी घ्ोवून पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाचं बापाचं... अशा घोषणा देत रायगड भवन गाठले.मोर्चात महिलांची संख्या अधिक असल्यामुळे  रायगड भवनाबाहेर पोलिसांची कुमत वाढवण्यात आली होती. 'भर पावसाळ्यात स्वप्नपूर्तीच्या रहिवाशांच्या घरात पाणी येत नाही. बाहेर पाऊस अन्‌घशाला कोरड, अशी अवस्था आमची झाली आहे. स्वप्नपूर्तीच्या घरातील नळात पाणी नाही, परंतु त्यांच्या घरांच्या भिंतींतून लिकेजच्या समस्या आहेत. यांचा बांधकामही निकृष्ट दर्जाचं आहे. सिडकोने आम्हाला समस्याचे घर दिले आहे,'असा आरोप रहिवाशांकडून करण्यात आला.जवळपास दोन तासांच्या घोषणाबाजीनंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी लेखी आश्वासन देऊन मोर्चा स्थगित करण्याची विनंती केली. पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता व्ही. बी गायकवाड यांनी दिलेल्या आश्वासनाच्या पत्रात म्हटले आहे की, हेटवणे धरणाची पाईपलाईन, खारपाडा पूल परिसरातील आपत्कालीन दुरुस्तीच्या कामामुळे 9 ते 10 जुलै कालावधीत द्रोणागिरी, उलवे, खारघर व तळोजा नोडमध्ये पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले असून लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल. यापुढे पाणी नियमित राहील व पुरेसा पाणीपुरवठा होईल, याची काळजी घ्ोण्यात येईल असे सांगितले. या वेळी उपस्थित नागरिकांनी यापुढे पाण्याची समस्या उद्भवल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि त्याला सिडको प्रशासन जबाबदार असेल, असे स्वप्नपूर्ती रहिवाशांनी अधिकाऱ्यांना खडसावले. सिडकोच्या कथित विकासाच्या गजरात ‘स्वप्नपूर्ती”तील साडे तीन हजार कुटुंबांची तहान नजरेआड गेली आहे. घरोघरी नळ कोरडे आणि भिंतींतून पाणी गळत असल्याची विडंबनात्मक स्थिती या भागात उद्भवली असल्याचे उपस्थित माहिलांनी सांगितले.

या मोर्चात तीनही सोसायटीचे पदाधिकारी तसेच रहिवासी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व शरद बिबवे, बाळकृष्ण खोपडे आणि दिलीप पाटील यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेलकरांना मालमत्ता करावरील शास्तीमध्ये सवलत