कोकण रेल्वेची तिकीट तपासणी मोहीम तीव्र
नवी मुंबई : काही दिवसांवर येऊ घातलेल्या गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र केली आहे. कोकण रेल्वे मार्गावर विना तिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी आणि तिकीट असलेल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळावा यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनिल नारकर यांनी दिली आहे.
कोकण रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत 3,765 तिकीट तपासणी मोहिमा घेण्यात आल्या आहेत. या मोहिमांमध्ये, 40,602 अनधिकृत प्रवाशांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल 2,37,11,161/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी मोठÎा प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे, कोकण रेल्वेने सर्व प्रवाशांना वैध तिकीटासोबतच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षा आणि सोयी सुविधांवर विशेष लक्ष दिले जात आहे. या सणासुदीच्या काळात सर्व प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास देण्यावर कोकण रेल्वेचा भर असणार आहे. त्यामुळे, संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणीची मोहीम तीव्र केली जाणार असल्याचे सुनील नारकर यांनी सांगितले.