ग्रामीण भागातील शेवगा दुबईला रवाना
‘उमेद'साठी ठरला ऐतिहासिक दिवस
नवी मुंबई : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, अपेडा आणि एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री यांच्या संयुक्त पुढाकारातून पंढरपूर तालुक्यातील शिवस्वराज शेतकरी महिला उत्पादक कंपनीचा शेवगा थेट दुबईला निर्यात झाला.
‘उमेद'साठी तो ऐतिहासिक दिन ठरला असून याचा शुभारंभ २८ मार्च रोजी कोपरखैरणे येथे करण्यात आला. इथल्या कोल्डस्टोरेज मधून निर्यातीसाठी शेवग्याने भरलेल्या कंटेनरला ‘उमेद अभियान'चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी हिरवा झेंडा दाखवला.
याप्रसंगी ‘उमेद महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान'चे अतिरिक्त संचालक परमेश्वर राउत, ‘अपेडा'चे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे, अवर सचिव धनवंत माळी, उपसंचालक मंजिरी टकले, संदीप जठार, ‘एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री'चे चेअरमन प्रवीण वानखडे, ‘शिवस्वराज शेतकरी उत्पादक कंपनी'च्या अध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळातील महिला उपस्थित होत्या.
यापुढे राज्यभरातील महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृध्द होण्यासाठी आमची यंत्रणा प्रयत्नशील राहील. शेतमाल निर्यात करण्यासाठी राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर कोल्ड स्टोरेजची व्यवस्था मिळविण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाचे वेगवेगळ्या विभागासोबत समन्वय करण्यात येईल, असे निलेश सागर यांनी सांगितले.
‘अभियान'चे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी ‘उमेद'च्या महिलांचा शेतमाल निर्यात होण्याच्या अनेक शक्यता असून खरेदीदार आणि महिला यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्यात येईल, असे सांगितले. पहिल्या परदेशी निर्यातीमुळे राज्यभरातील ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. ‘उमेद अभियान'च्या गरीबी निर्मुलनाच्या उद्दिष्टातून ‘लखपती दीदी' घडविण्याच्या प्रक्रियेचा आजचा टप्पा अत्यंत महत्वाचा असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
‘अपेडा'चे उपमहाव्यवस्थापक नागपाल लोहकरे यांनी त्यांच्या विभागाकडून उमेद अंतर्गत ग्रामीण महिलांचा शेतमाल निर्यात होण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातील ग्रामीण महिलांना त्यांच्या हक्काची अंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी यापुढेही मदत सुरु राहील, असे मनोगतातून सांगितले.
तर ‘एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री'चे चेअरमन प्रवीण वानखडे यांनी राज्यभरातील शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता गट यांच्यामार्फत कितीही शेतमाल बाहेरच्या देशात पाठविता येईल. मात्र, त्यासाठी शेतीमालाचा दर्जा सुध्दा सर्वोत्तम असण्याची गरज व्यक्त केली.
भारतातील शेतीमालाला परदेशात चांगली मागणी असल्याने आम्ही त्यासाठी चांगले निर्यातदार उपलब्ध करून देऊ, असा विश्वास वानखेडे यांनी व्यक्त केला.
‘उमेद अभियान'च्या अंतर्गत कार्यरत महिलांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी आमची यंत्रणा सातत्याने प्रयत्न करीत आहे. एक्सिम फार्मर इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि अपेडा यांच्या मदतीने पहिला कंटेनर दुबईला जात आहे. दर्जेदार शेवग्याचे उत्पादन महिलांनी केल्यामुळे त्यांचा शेवगा आज निर्यात होत असल्याने तो ऐतिहासिक दिवस आहे.
‘अभियान'च्या दृष्टीने आजचा दिवस मैलाचा दगड ठरणार आहे.
-निलेश सागर, सीईओ-उमेद अभियान.
आम्ही उत्पादित केलेला शेवगा स्थानिक बाजारपेठेपेक्षा खूप जास्त दराने निर्यात होत आहेत. त्यामुळे आमच्या सर्व महिलांना खूप आनंद होत आहे. आम्ही आता आमच्या भागातील महिलांना निर्यात होऊ शकणाऱ्या शेती उत्पादनाचा आग्रह इतर महिलांना देखील करणार आहोत.
-कौशल्य जाधव, अध्यक्षा-शिवस्वराज्य शेतकरी महिला उत्पादक गट.