उरण मधील पाणथळी जागांचे जागतिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित
उरण : उरण तालुक्यातील पाणथळी भागात नुकतेच दुर्मिळ समजले जाणारे Red-necked Phalarope (Phalaropus lobatus) ‘लाल मानेचा फलारोप' आणि Spotted redshanks (Tringa erythropus) ‘ठिपक्यांचा टिलवा' या पक्ष्यांचे ‘फ्रेंड्स ऑफ नेचर'(फॉन), चिरनेर-उरण' या संस्थेचे वन्यजीव अभ्यासक आणि पक्षी निरीक्षक निकेतन रमेश ठाकूर यांना २८ एप्रिल रोजी बेलपाडा येथील पाणथळींमध्ये दर्शन झाल्याने या भागाचे जैवविविधतेतील अनमोल स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. निकेतन ठाकूर आणि त्यांचे सहकारी हेमंत वारे, दिलीप कदम आदी पक्षी निरीक्षणासाठी उरण तालुवयातील बेलपाडा आणि सावरखार येथे गेले असता त्यांना एक रेड नेक्ड फलारोप आणि १६ स्पॉटेड रेडशँक दिसले. त्यांनी त्याची नोंद ई - बर्ड या जागतिक पक्षी निरीक्षण नोंदीच्या संकेतस्थळावर केली आहे.
रेड नेक्ड फलारोप आणि स्पॉटेड रेडशँक आदी दोन्ही स्थलांतरित पक्षी असून, विशेषतः त्यांच्या परतीच्या स्थलांतर मार्गात त्यांचे दर्शन दुर्मिळ मानले जाते, अशी माहिती जेष्ठ पक्षी अभ्यासक आदेश शिवकर यांनी दिली.
उरण भागातील दलदली, खारफुटी आणि उथळ जलक्षेत्रे स्थलांतरित आणि देशी पक्ष्यांसाठी अत्यंत आवश्यक अधिवास म्हणून ओळखली जातात. तसेच पावसाळ्यात आणि भरती-ओहोटी क्षेत्रातील पाणी निचरा होण्याकरिता धारण तलाव उपलब्ध असणे आवश्यक आहे. स्थानिक मासेमारांना धारण तलावातील मासळी पकडून त्यांचा उदरनिर्वाह करता येणार आहे. निसर्ग पर्यटनास चालना मिळाली तर स्थानिकांना योग्य रोजगार देखील प्राप्त होणार आहे.
उरण तालुवयातील पाणथळी जागा जैवविविधतेच्या दृष्टीने समृध्द असून, या पाणथळी जागा अनेक दुर्मिळ आणि संकटग्रस्त पक्ष्यांना आश्रय देत आहेत. पक्ष्यांच्या आश्रय ठिकाणांचे संरक्षण आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे, असे मत ‘फ्रेंड्स ऑफ नेचर'चेे संस्थापक- अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, रेड नेक्ड फलारोप आणि स्पॉटेड रेडशँक या दुर्मिळ पक्ष्यांच्या नोंदीमुळे उरण तालुक्यातील पाणथळी क्षेत्र अधिक संवेदनशील आणि संरक्षित घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे.