मृत महिला जिवंत असल्याचे भासवून कोट्यवधीचे भूखंड हडप
पनवेल : मृत महिला जिवंत असल्याचे भासवून तिच्या नावे आणि तिच्या मुलाच्या नावे असलेले पनवेल तालुक्यातील धोधाणी, वाघाची वाडी येथील कोट्यवधी रुपये किंमतीचे २ भूखंड टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे हडप करण्यात आलेले दोन्ही भूखंड तिसऱ्या आणि चौथ्या व्यक्तींना विकल्याचे आणि त्यातील एका भूखंडावर इमारत उभी असल्याचे आढळून आले आहे. पनवेल तालुका पोलिसांनी या टोळीतील २ व्यक्तींविरोधात फसवणुकीसह संगनमत करुन बनावट कागदपत्र तयार करणे, मृत व्यक्तीच्या नावाचा दुरुपयोग करणे, आदि कलमांखाली गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
पनवेल येथे राहणाऱ्या नीला चंद्रकांत महागांवकर यांनी १९७३ साली पनवेल तालुक्यातील धोधाणी येथील वाघाची वाडी येथे १३.८० गुंठे इतकी जमीन विकत घेतली होती. तर त्यांचा मुलगा संजय महागांवकर यांच्या नावे १९८० रोजी ११ गुंठे इतकी जमीन विकत घेतली होती. यादरम्यान १२ जुलै २००८ रोजी नीला महागांवकर यांचा मृत्यू झाला. कामानित्त संजय महागांवकर कुटुंबासह गुजरात येथे गेल्यानंतर ते २०११ पर्यंत दोन्ही भुखंडाची घरपट्टी गाढेश्वर ग्रामपंचायतीमध्ये नियमित भरत होते. मात्र, त्यानंतर त्यांचे आपल्या भूखंडाकडे दुर्लक्ष झाले.
याचाच फायदा उचलत ऑगस्ट २०१५ मध्ये डेरवली गांव येथील प्रभाकर बंडू नाईक याने नीला महागांवकर या मृत असताना, त्यांच्या नावाचे बनावट मतदार ओळखपत्र तयार केले. त्यानंतर त्यांच्या जागी दुसरी महिला उभी करुन, त्यांच्या नावे असलेली १३.८० गुंठेची जमीन प्रभाकर नाईक याने स्वतःच्या नावे करुन घेतली. त्याचप्रमाणे वाशी येथील अंबावी रणछोड पटेल (४८) याने संजय महागांवकर यांचे देखील खोटे मतदार ओळखपत्र तयार करुन यांच्या ऐवजी दुसरा पुरुष उभा करुन, त्यांच्या नावे असलेला ११ गुंठेचा भूखंड स्वतःच्या मालकीच्या हिंगलाज इंटरप्रायझेसच्या नावे करुन घेतला. या व्यवहारांमध्ये दोन्ही भूखंडांच्या खरेदीखतांवर महागांवकर आणि त्यांच्या आईच्या खोट्या सह्या करण्यात आल्या.
त्यानंतर प्रभाकर नाईक याने नीला महागांवकर यांचा हडप केलेला भूखंड १९ सप्टेंबर २०१७ रोजी जर्नादन चांगा पाटील याला विकला, तर पाटील याने ११ एप्रिल २०१९ रोजी रमेश आणि संतोष घरत यांना विकला. त्यानंतर त्यांनी १६ मार्च २०२२ रोजी रोचीशनू घोष यांना विकला. अशा प्रकारे सदर जमीन ४ जणांकडे हस्तांतरीत झाली. सध्या या जमिनीवर रहिवाशी इमारत उभी असून त्यात अनेक कुटुंब राहण्यास आले आहेत. तर अंबावी रणछोड पटेल याने संजय महागांवकर यांचा हडप केलेला भूखंड ९ सप्टेंबर २०२२ रोजी चेंबूर येथील अदित्य शैलेश सचदेव यांना विकल्याचे उपलब्ध कागदपत्रावरुन आढळून आले आहे. सध्या या जमिनीवर बांधकाम सुरु आहे.
असा उघड झाला घोटाळा...
या प्रकरणातील तक्रारदार संजय महागांवकर यांनी जून २०२३ मध्ये आपली पत्नी आणि मुलाला जमिनीची घरपट्टी भरण्यासाठी पनवेल येथे पाठवले होते. त्यावेळी त्यांच्या आणि आईच्या नावावर असलेली जमीन दुसऱ्यांच्या नावावर असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर संजय महागांवकर यांनी गतवर्षभरामध्ये विविध शासकीय कार्यालयातून माहितीच्या अधिकारात या जमीन व्यवहारातील कागदपत्रे मिळवल्यानंतर त्यांच्या जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे हडप करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.