जगातील सर्वात उंच शिखरावर फडकला भारतीय तिरंगा
डोंबिवली : डोंबिवली मधील २३ वर्षीय गिर्यारोहक आर्यन शिरवाळकर याने भारताचा तिरंगा जगातील सर्वांत उंच शिखरावर रोवला आहे. जगातील सर्वात उंच स्वतंत्र पर्वत आणि सात शिखरांपैकी एक आफ्रिका खंडातील पूर्व आफ्रिका मधील टांझानिया देशातील सर्वात उंच पर्वत माऊंट किलिमांजारो डोंबिवली मधील २३ वर्षीय गिर्यारोहक आर्यन शिरवाळकर याने अवघ्या १३ दिवसाच्या मोहिमेअंतर्गत सर केला. या पर्वताची उंची १९,३४१ फुट (५,८९५ मीटर) आहे. माऊंट किलिमांजारो पर्वत सर करणारा ठाणे जिल्ह्यातील पहिला गिर्यारोहक ठरल्याने आर्यनवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
डोंबिवली पूर्वे कडील एमआयडीसी निवासी विभागातील पाम व्ह्यू सोसायटीत राहणारा आर्यन अजित शिरवाळकर याला लहानपणापासूनच खडक, डोंगर, गड, किल्ले पर्वतावर चढण्याची आवड निर्माण असल्याने त्याने वयाच्या १५ व्या वर्षापासून आपली सदर आवड जोपासायला लागला. त्यासाठी त्याने मनाली येथे गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यानंतर आर्यन याने वयाच्या १६व्या वर्षी पहिल्यांदा पथल शु माऊंटन (१३,५०० फुट) सर केला. आर्यन शिरवाळकर याने भारतातील हिमाचल, उत्तराखंड आणि अन्य राज्यातील ५० हून अधिक पर्वत, गड-किल्ले तसेच महाराष्ट्रातील ५०० हून अधिक गड-किल्ले, पर्वत सर केले आहेत.
जगातील सर्वात उंच माऊंट किलिमांजारो पर्वत समुद्रसपाटी पासून १९,३४१ फुट उंच असून सदर माऊंट सर करण्यासाठी आर्यन याने ६ ते १२ जुलै या ७ दिवसाच्या कालावधीची मोहीम हाती घेतली. १२ जुलै रोजी माऊंट किलिमांजारो पर्वत सर करीत आर्यन शिरवाळकर याने सदर मोहीम फत्ते करीत या उंच शिखरावर भारताचा तिरंगा फडकवला. या ७ दिवसाच्या मोहिमेमध्ये कमी वायूदाब, कमी ऑक्सिजन, लांबवर पसरलेले रस्ते आणि उपलब्ध पाणी अशा अनेक कठीण परिस्थितीला पार करत समोर जावे लागले असल्याचे आर्यन याने सांगितले.
दरम्यान, आतापर्यंत आर्यन याने १० पेक्षा जास्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले असून, सर्व कोर्सेसमध्ये अल्फा ग्रेड मिळवला आहे. याव्यतिरिक्त आर्यन महाराष्ट्रातील विविध कंपन्यांसाठी प्राथमिक उपचार, आऊटडोअर शिक्षण, नेतृत्व कौशल्ये आणि समस्यांचे निराकरण यावर कार्यशाळा आणि प्रशिक्षण सत्रे घेत आहे. जेणेकरुन अधिकाधिक लोकांना सुरक्षित आणि जबाबदारपणे निसर्गाशी जोडता येईल.