‘उरण'ला चक्रीवादळाचा तडाखा
उरण : उरण तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून अनेक गावातील रहिवाशांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात २६ मे रोजी पहाटे ५ च्या सुमारास धडकलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात कळंबुसरे गावातील जवळपास २५ पेक्षा जास्त घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच चिरनेर, मोठी जुई, वशेणी, विंधणे, दिघोडे, कोप्रोली सह इतर गावांतील घरांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. चक्री वादळात कोसळलेल्या पावसामुळे अनेक सकल भागात पाणी साचले होते. या नैसर्गिक संकटाची माहिती ‘उरण'चे आमदार महेश बालदी यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी करुन तातडीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तसेच महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
उरण तालुक्यातील अनेक गावांना चक्रीवादळाचा तडाखा बसला असून रहिवाशांच्या घरावरील कौले, पत्र्याचे छप्पर उडून गेल्याने घरात पाणीच पाणी साचले. त्यामुळे घरातील अन्नधान्य, कपडे, जीवनावश्यक वस्तू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्युत वाहक पोल, तारा पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला असून मोठ मोठाली झाडे उन्मळून पडली आहेत. रहिवाशांच्या सावधगिरीमुळे जीवितहानी झाली नाही. उरण तालुक्यावर ओढवलेल्या नैसर्गिक संकटाची माहिती आमदार महेश बालदी यांना मिळताच त्यांनी तालुक्यातील कळंबुसरे गावासह इतर गावांचा आढावा घेऊन, प्रत्यक्षपणे नुकसानग्रस्त रहिवाशांच्या घराची पाहणी करुन तात्काळ रहिवाशांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला. तसेच ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी वाशी येथील महावितरण विभागाचे प्रमुख अधिकारी डी. के.पाटील, उरण महावितरण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे यांनी युध्दपातळीवर खंडीत झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी भरपावसात काम सुरु केले आहे. मात्र, अनेक सकल भागात पावसाचे पाणी साचल्याने आणि झाडे उन्मळून पडल्याने ‘महावितरण'च्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे.
आमदार महेश बालदी यांनी तातडीने तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या उपस्थितीत कळंबुसरे गावात आढावा बैठक घेऊन नुकसानग्रस्त रहिवाशांना शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत देण्यासंदर्भात तहसीलदार डॉ. कदम यांना सूचना केली. तसेच उरण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला तालुका असल्याने या तालुक्यात अंडरग्राऊंड विद्युत वाहक केबल टाकण्यासाठी ‘महावितरण'ला सुचित केले आहे.
याप्रसंगी ‘भाजपा'चे तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, ‘शेकाप'चे तालुका चिटणीस रवि घरत, ग्रामिण तालुका अध्यक्ष धनेश गावंड, उद्योजक देवेंद्र पाटील, ‘भाजपा'चे मुकुंद गावंड, माजी जिल्हा परिषद सदस्य जिवन गावंड, माजी सरपंच सुशिल राऊत, महावितरण अभियंता वर्षा मगर, कुलदीप नाईक, शशिकांत पाटील, रत्नाकर राऊत, सरपंच सौ. उर्मिला नाईक, उपसरपंच ॲड. प्रशांत पाटील, ॲड. निनाद नाईक, ‘शेकाप'चे ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन नुकसानग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.